Maharashtra Navnirman Sena : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात मराठा आंदोलक आणि शिवसेना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे विधान राज ठाकरे सोलापूर (Solapur) येथे म्हणाले होते. त्यानंतर मराठा समाज ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. ठाकरे यांच्या विरोधात आंदोलनही सुरू झाले आहे. अशात बीड जिल्ह्यात ठाकरे यांचा ताफा अडविण्यात आला. त्यांच्या वाहनावर सुपाऱ्या फेकरण्यात आल्या. मराठा आंदोलकांसह शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.
राज ठाकरे हिंगोलीतून (Hingoli) बीडमध्ये दाखल झालेत. त्यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र अशाातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांनी बाजुला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलकांनी ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या भिरकावल्या. लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांनी सुपारी घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीत कोणाची सुपारी घेतली, असा सवाल आंदोलकांनी केला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज यांचा विरोध असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
राजकीय आंदोलन
राज ठाकरे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न शिवसेना बीड जिल्हा अध्यक्ष गणेश वरेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आला. त्यामुळे हे मराठा समाजाचे नसून शिवसेनेचा खोडसाळपणा होता, असा प्रत्यारोप आता मनसेकडून होत आहे. मराठा समाजातील अनेकांनी आतापर्यंत राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यापैकी जवळपास सगळेच समाधानी होऊन गेले आहेत. मनसेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याने शिवसेना घाबरली आहे. त्यामुळे त्यांनी असे आंदोलन केल्याची टीका मनसेकडून करण्यात आली आहे.
मनसे विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे सध्या राज्याचा दौरा करीत आहेत. लवकरच ते विदर्भातही येणार आहेत. सध्या ते बीडमधील विधानसभा मतदारसंघांचा आढाव घेणार आहेत. राज ठाकरे शुक्रवारी (ता. 9) बीडमध्ये दाखल झालेत. जालना रोड (Jalna) परिसरात अडीच क्विंटल फुलाच्या हाराने जेसीबीच्या माध्यमातून राज यांचे स्वागत करण्यात आले. राजकीयदृष्ट्या बीड जिल्हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे बीडमध्ये मनसे राजकीय ताकद वाढवू पाहात आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेचे महायुतीला साथ दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळाची तयारी करीत आहे.