महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : जयंत पाटील म्हणतात, मला मुख्यमंत्री व्हायचेय!

Jayant Patil : महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता

Chief Minister In Maharashtra : महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असलेले काही नेते आहेत. काही काँग्रेसमध्ये दोन-तीन, राष्ट्रवादीत एक-दोन आणि काही शिवसेेनेतही आहेत. मुख्यमंत्री कुणाला व्हायचे नाही? प्रत्येकालाच इच्छा असते. मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण राजकारणात व्यवहार्यता पाळावी लागते, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडली. त्यामुळे महाविकास आघाडीतील इच्छुक मुख्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेल्यापासून सगळ्या नजरा तिकडे लागल्या आहेत. त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधींसह काँग्रेसच्या सर्व जेष्ठ नेत्यांची भेट घेतली. बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाल्याची माहिती राजकीय वर्तुळातूनच पुढे आली. उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी दिल्लीत मुजरा केल्याची टीकाही विरोधकांनी केली. पण जयंत पाटील यांना ‘मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का?’ असा प्रश्न करण्यात आला. आणि त्यांच्या उत्तराने सध्या महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे टेंशन वाढले आहे.

राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीत ‘इ-मुख्यमंत्री’ (इच्छुक मुख्यमंत्री) खूप आहेत, अशी कोटी केली होती. त्याला जयंत पाटील यांनी स्वतःच दुजोरा दिला आहे. त्याचवेळी महायुतीमध्येही अनेक नेते मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘पक्ष वाढविणे माझी जबाबदारी आहे. कोण मुख्यमंत्री होणार, हे निकालानंतर संख्याबळावर ठरेल. महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे करून निवडणूक लढणार नाही. राज्यातील जनता शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून महाविकास आघाडीला मतदान करणार आहे. त्यामुळे इच्छा असण्या-नसण्याला अर्थ नाही. प्रत्येकाची इच्छा असते. मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण राजकारणात व्यवहार्यता पाळावी लागत असते.’

प्रत्येकवेळी दावा सोडूच असे नाही!

अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही कमी जागांवर लढलो. पण आमचा स्ट्राईक रेट चांगला होता. विधानसभेत यापूर्वी आम्ही जास्त जागा जिंकल्या आहेत. पण संख्याबळ जास्त असतानाही मुख्यमंत्रीपदावरील दावा आम्ही यापूर्वी सोडला आहे. प्रत्येकवेळी तसेच घडेल असे नाही, असे सांगून जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा भक्कम केला आहे.

Ajit Pawar : महायुतीत मोठ्या हालचाली; नेत्यांची मध्यरात्री बैठक

अजितदादांना नो एन्ट्री!

शरद पवारांना सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार का, असा प्रश्नही जयंत पाटील यांना करण्यात आला. त्यावर काही नेत्यांना घेऊ शकतो, पण अजित पवारांना घेण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काही नेते आजही संपर्कात आहेत. त्यांची इच्छा असल्यास त्यांना नक्कीच पक्षात परत घेऊ. त्यामुळे पक्ष मजबूत होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!