Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक विधानाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असतं. ते विधीमंडळात असो, राजकीय सभेत असो वा सांस्कृतिक व्यासपीठावर असोत. फडणवीस काय बोलले, कुणावर आरोप केलेत, कुणाला प्रत्युत्तर दिले याची सतत चर्चा असते. पण ठाण्यातील एका कार्यक्रमात तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच फिरकी घेतली. आणि त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही ओढले.
ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या ‘योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचं प्रकाशन होतं. यावेळी तिघेही व्यासपीठावर होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांचं भावुक भाषण झालं. पण अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांनी श्रोत्यांना खदखदून हसवलं. यावेळी फडणवीस यांनी लेखकाला दिलेला सल्ला सर्वांच्या विशेष लक्षात राहिला.
ते म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांच्याकडून संयमीपणा हा शिकण्यासारखा गुण आहे. ते लोकांचं शांतपणे ऐकून घेतात, पण जेव्हा त्यांचा संयम सुटतो तेव्हा ते कुणाचच ऐकत नाहीत.’ ते पुढे म्हणाले, ‘एकनाथराव कधी झोपतात, कधी उठतात हे त्यांच्या घरीही माहिती नाही. त्यामुळे माझा लेखकाला सल्ला आहे की, या पुस्तकाची पुढची आवृत्ती काढाल तेव्हा अजित पवारांना सहसंपादक म्हणून सोबत घ्या.’ जेणेकरून एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अधिक सविस्तर माहिती प्रकाशित करता येईल, असेही ते म्हणाले.
हे फक्त शिंदेच करू शकतात
एकनाथ शिंदे यांनी सत्ता सोडली. आपल्या आमदारांना सोबत घेतले आणि त्यानंतर पुन्हा सत्ता स्थापन केली. हे फक्त एकनाथ शिंदेच करू शकतात, असे फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या जून २०२२ मधील बंडाची चर्चा होणार हे सर्वांना माहिती होते. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातून त्याची सुरुवात झाली.
मी तर एकाच टर्ममध्ये..
देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीपासून तर अजितदादा भाजपसोबत येण्यापर्यंतचा प्रवास त्यांच्या शैलीत सांगितला. ते म्हणाले, ‘मी तर एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेता आणि उपमुख्यमंत्री झालो. अजितदादा एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते आणि नंतर पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. पण या सर्वांत एकनाथ शिंदे यांनी जो विक्रम केला आहे तो कुणीही मोडू शकणार नाही. त्यांनी सत्ता सोडली. आमदारांना घेऊन सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री झाले. हे फक्त तेच करू शकतात.’