Change Before Election : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सनदी व आयपीएस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांची बदली करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. त्यानुसार आयपीएस आणि राज्य पोलिस सेवा श्रेणीती अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने बुधवारी (ता. 7) काढले. त्यानुसार विदर्भातील चार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत उपायुक्त गोरख भामरे यांना गोंदियात पोलिस अधीक्षक पदावर बदली देण्यात आली आहे. नागपूर एसआरपीएफच्या समादेशक प्रियंका नारनवरे या नागपूर लोहमार्ग विभागाच्या (GRP) नव्या पोलिस अधीक्षक असतील. गोंदियाचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना पुणे शहरात उपायुक्त पदावर पाठविण्यात आले आहे. राज्य पोलिस सेवेतील अधिकारी अविनाश बारगळ हे गुन्हे अन्वेषण विभाग (CID) अमरावती येथे कार्यरत होते. बारगळ आता बीडचे पोलिस अधीक्षक असतील. राज्यभरातील एकूण 12 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी काढण्यात आले आहेत.
बदल्यांचा दुसरा दिवस
गृह विभागाचे सलग दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई लोहमार्गचे एसपी संदीप भाजीभाकरे हे एसआयडी नागपूरचे एसपी असतील. सध्या या विभागात कार्यरत असलेल्या रश्मी नांदेडकर यांना नवी मुंबईत उपायुक्त पदावर पाठविण्यात आले आहे. अमरावतीच्या नागरी हक्क संरक्षण विभागात कार्यरत दत्ताराम राठोड हे नागपूर जीआरपीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक असतील. राज्यात येत्या दोन तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. या निवडणुकीपूर्वी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या. पहिल्या दिवशीच्या यादीत 16 अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर बुधवारी आणखी 12 जणांची बदली करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत 28 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
आयपीएस आणि राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुकीत फेरबदल झाल्यानंतर आता उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली होणार आहे. आयपीएस अधिकाऱ्यांनंतर महसूल विभागात कार्यरत असलेल्या सचिव, अप्पर सचिव, अतिरिक्त सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (SDO), तहसीलदार यांचीही बदली होणार आहे. लवकरच महसूल विभागही हे आदेश काढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. जून अखेरीस पासून राज्यात हे बदलीसत्र सुरू झाले आहे. याशिवाय निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अनेक पोलिस अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेटही दिली आहे.