Fund For Tourism : काही राजकीय नेते विकास कामाच्या आड पक्षीय राजकारण येऊ देत नाही. विरोधी बाकांवर बसणाऱ्या नेत्यांच्याही मतदारसंघातील जनतेपर्यंत असे नेते विकासाची गंगा पोहोचवितात. आपल्या या कृतीतून मग हे नेते विरोधकांचेही मन जिंकतात. असाच प्रत्यय दिला आहे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी. सांस्कृतिक मंत्र्यांनी दिलेल्या निधीमुळे शरद पवार यांचे नीकटवर्तीय तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील यांनीच थेट सोशल मीडियावर मुनगंटीवार यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा हा बालेकिल्ला. काटोल तालुक्यातील केदारपूर येथे पर्यटन विकास व्हावा, यासाठी देशमुख यांनी निधीची मागणी केली होती. स्वत: देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले होते. महायुतीचे सरकार असल्याने देशमुख यांच्या मतदारसंघातील कामाला निधी मिळणार नाही, असा अनेकांचा समज होता. मात्र हा समज मुनगंटीवार यांनी मोडीत काढला.
भरघोस निधीची तरतूद
विकासाचे काम करताना कधीही पक्षीय राजकारण आड येऊ देणार नाही, असे मुनगंटीवार नेहमीच सांगतात. मात्र केवळ ही बाब बोलण्यापुरती मर्यादीत नाही. ती कृतीतूनही मुनगंटीवार यांनी दाखवून दिले. केदारपूरच्या पर्यटन विकासासाठी मुनगंटीवार यांनी 2 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. केदारपूरला निधी मंजूर झाल्याचे कळताच सलील देशमुख यांनी ट्विट करीत मुनगंटीवार यांचे आभार मानले. सलील यांनी यासाठी मुनगंटीवार यांच्यासोबतचा फोटोही पोस्ट केला आहे. संकुचित विचार न करता मोठ्या मनाने निधी दिल्याचे सलील यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
Sudhir Mungantiwar : पोंभुर्णातील दहा गावांना ‘पेसा’साठी पुढाकार
महाराष्ट्राच्या राजकारणात गलीच्छपणा आला आहे. त्याला मुनगंटीवार यांनी छेद दिल्याचेही सलील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. केदारपूर काटोल मतदारसंघात असल्याचे माहिती असल्यानंतरही मुनगंटीवार यांनी या निधीसाठी सतत पाठपुरावा केला. याचा उल्लेखही सलील यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. आपल्या पाठपुराव्यालाही सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सलील देशमुख यांनी आनंद व्यक्त केला. काटोलच्या जनतेकडूनही त्यांनी मुनगंटीवार यांचे प्रातिनिधिक आभार व्यक्त केले. त्यामुळे निकोप राजकारण कसे करावे, याचे उत्तर उदाहरण मुनगंटीवार यांनी दाखविले आहे. सध्या सोशल मीडियावर सलील यांची ही पोस्ट चर्चेत आहे. आपल्या कृतीतून मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचेही मन जिंकल्याचे यावरून बोलले जात आहे.