Bangladesh Clash : बांगलादेशमध्ये गेल्या महिन्याभरापासून चालू असलेल्या घडामोडींची टोकाची परिणती झाली आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा हिंसाचार थेट बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानापर्यंत पोहोचला. यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांनी थेट देश सोडून भारताचा आश्रय घेतला. अवघा बांगलादेश सध्या होरपळत आहे. अशा संकटाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तेथील हिंदूंची चिंता आहे. बांगलादेशातील हिंदू सुरक्षित असले पाहिजे, यासाठी संघाने तातडीने केंद्र सरकारला निवेदन पाठविले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आणि माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी नागपुरात ही माहिती दिली. नागपुरात प्रसार माध्यमांशी जोशी यांनी संवाद साधला. रामनगर परिसरात देवता फाऊंडेशनच्या एक रुपया दान, कॅन्सरमुक्त अभियान या कार्यक्रमानंतर जोशी यांनी पत्रकारांशी चर्चा केली. बांगलादेश हा एक वेगळा देश आहे. आम्ही सरकारला निवेदन करतो की तेथे हिंदू सुरक्षित राहतील, याची काळजी घेणे गरजेचे आहे. बांगलादेशमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती लवकर शांत होईल असे वाटत नाही, असे जोशी म्हणाले.
सरकारकडे पाठपुरावा
बांगलादेशमधील हिंदू सुरक्षित असला पाहिजे, असे निवेदन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केंद्र सरकारला पाठविण्यात आले आहे. सरकार यासाठी योग्य पावले उचलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. मंदिर तोडली जात आहेत. बांगलादेशात वास्तव्यात असलेले जवळपास एक कोटी हिंदू निर्वासित भारतात येतील, अशी भीती भाजपा नेते आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनीही व्यक्त केली होती. बांगलादेशात हिंदूंची कत्तल केली जात आहे. गपूर नगर परिषदेचे नगरसेवक हरधन नायक यांची हत्या करण्यात आली. सिराजगंज येथे 13 पोलिसांची हत्या करण्यात आली, त्यापैकी नऊ हिंदू होते, असे अधिकारी म्हणाले.
बांगलादेशमधील शेरपूर जिल्ह्यातील एका तुरुंगावर हल्ला झाला. तुरुंगातील 500 पेक्षा अधिक कैद्यांना सोडविण्यात आले. यात अनेक कट्टर व क्रुर दहशतवादी आहेत. प्रामुख्याने जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश या दहशतवादी संघटनेतील दहशतवादी तुरुंगातून फरार झाले आहेत. त्यामुळे बांगलादेश सैन्यासह भारताची चिंताही वाढली आहे. भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेले काही दहशतवादी देखील या तुरुंगात शिक्षा भोगत होते, ते देखील फरार झालेत.
Bangladesh Crises : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार
पाकिस्तान, चीनचा हात?
शेख हसीना यांचे सरकार पाडण्याचे कारस्थान पाकिस्तानच्या आयएसआयच्या सहाय्याने लंडनमध्ये आखल्या गेल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना आहे. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे (BNP) प्रमुख आणि माजी पंतप्रधान खलिदा झिया यांचा मुलगा तारीक रहमान आणि आयएसआय अधिकाऱ्यांमध्ये सौदी अरेबियामध्ये बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. बीएनपी हा पाकिस्तानधार्जिणा पक्ष आहे. हसीना देशाबाहेर जाव्या, यासाठी चीननेही आयएसआयमार्फत प्रयत्न केल्याचे सांगतिले जात आहे.
ज्योतिष्याची पोस्ट चर्चेत
प्रसिद्ध ज्योतिषी प्रशांत किनी यांनी बांगलादेशबाबत 14 डिसेंबर 2023 रोजी भाकित वर्तविले होते. त्यांनी याबाबत ट्विट केले होते. 2024 मधील मे, जून, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न होऊ शकतो, असे भाकीत त्यांनी या पोस्टमध्ये वर्तविले होते. किनी यांनी ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. बांगलादेशमध्ये जुलै महिन्यांपासून हिंसाचार सुरू झाला. त्यानंतर हसीना यांच्यावर हल्ला करण्यासाठी ऑगस्टमध्ये जमाव चालून आला. 5 ऑगस्टला हसीना यांनी राजीनामा देत भारतात आश्रय घेतला आहे.