New Decision : संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आता कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI) वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारावर कॅमेऱ्याच्या मदतीने परीक्षा देणाऱ्या उमदेवारांची 80 पद्धतीने तपासणी होणार आहे. उमेदवाराचा केवळ चेहराच नव्हे तर बोटांचे ठसे, बुबळ, डोळे, शरीराची हालचाल याचेही स्कॅनिंग करण्यात येणार आहे. यासाठी संघ लोकसेवा आयोग आपल्या परीक्षा प्रणालीत व्यापक बदल करणार आहे. परीक्षेच्या ठिकाणी देखील एआय कॅमेऱ्यांच्या मदतीने पाळत ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही उमेदवाराने गैरप्रकार केल्यास एआय तंत्रज्ञान थेट युपीएससीच्या मुख्यालयाला अलर्ट मॅसेज देणार आहे. परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची तपासणी करण्यासाठी ही पद्धत वापरली जाईल.
नव्या तंत्रज्ञानाचा वापर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कदाचित यंदाच्या वर्षापासूनच या तंत्रज्ञानाचा वापर परीक्षा प्रणालीत केला जाईल असे सांगण्यात येत आहे. यासाठी एआय तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांकडून युपीएससीने निविदा मागविली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने अगदी अर्ज भरण्यापासून तर परीक्षे पर्यंत उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची एआय कॅमेऱ्याद्वारे चेहऱ्याची ओळख पटविण्यात येणार आहे. केवळ चेहऱ्यापुरती हे स्कॅनिंग मर्यादीत राहणार नाही. दोन डोळ्यांमधील अंतर, नाकापासून डोळ्यांपर्यंतचे अंतरी तपासले जाणार आहे.
अनेक मुद्द्यावर करणार खात्री
हनुवटीपासून नाक आणि डोळ्यांपर्यंतचे अंतरही एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासण्यात येणार आहे. त्यानुसार चेहरा ओळखणारी प्रणाली काम करेल. चेहऱ्यावर 80 प्रकारचे नोड्स असतात. त्या सर्वांची खात्री एआय तंत्रज्ञान करणार आहे. परीक्षा कक्षात एखाद्या उमदेवाराच्या हालचाली संशयास्पद असल्याच कॅमेरा ते स्वत: ओळखेल. त्यानुसार कॅमेराला लावण्यात आलेली प्रणाली अलर्ट मॅसेज पाठवेल. देशभरातील सर्व केंद्रांवर एकाचवेळी ही यंत्रणा कार्यरत असेल. परीक्षा केंद्रात आल्यावर उमेदवाराला चेहऱ्याची ओळख, फिंगरप्रिंट आणि प्रवेशपत्राचे कोड स्कॅनिंग करावे लागेल.
महाराष्ट्रातील बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने अलीकडेच युपीएससीची दिशाभूल केली. नावात, पत्त्यात बदल करून तिने परीक्षा दिली. त्यामुळे उमेदवाराला चेहरा, बोटांचे ठसे आणि इतर 80 नोड्सच्या मदतीने ओळखण्याचे तंत्र आत्मसात करण्याचा निर्णय युपीएससीने घेतला. पूजाच्या बनवेगिरीमुळे देशभरातील 15 हजार उमेदवारांच्या माहितीची तपासणी युपीएससीला करावी लागली. नव्या तंत्रज्ञानानुसार वारंवार परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचीही ओळख होईल. अर्ज करणारा व परीक्षा देणारा उमेदवार एकच आहे की वेगवेगळे याचाही शोध घेता येणार आहे.
युपीएससी कडून देशभरातील सेवांसाठी 14 परीक्षा घेण्यात येतात. सुमारे 80 ठिकाणी परीक्षा व मुलाखत प्रक्रिया राबविण्यात येते. गरजेनुसार लेखी परीक्षांचे केंद्र ठरविण्यात येतात. सुमारे तीन हजार केंद्रांवर एकाच वेळी 12 लाख उमेदवारी परीक्षा देऊ शकतात अशी ही यंत्रणा आहे. युपीएससीकडून उमेदवाराची निवड करताना अत्यंत काटेकोरपणे नियमांचे पालन करण्यात येते. परंतु पूजा खेडकर सारखे काही उमेदवार या कठोर प्रणालीलाही भ्रमित करून सेवेत शिरकाव करण्यात यशस्वी होतात. त्यामुळे आता परीक्षा प्रणाली आणखी कडक करण्याचा निर्णय युपीएससीने घेतला आहे.