Shiv Sena Vs Shiv Sena : उद्धव ठाकरे यांचे पुण्याच्या सभेतील भाषण पाहिले तर त्यांना तातडीने मानसोपचारांची गरज आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी आज उद्धव ठाकरेंवर केली. मिठी नदीतील गाळ असो वा महापालिकेतील कंत्राटदार असोत लाच मिळाल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही, असेही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ‘भीक आणि लाच’ म्हणणाऱ्या उबाठाला राज्यातील माताभगिनी येत्या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असे वाघमारे म्हणाल्या. रविवारी (दि.४) बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला राज्यातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना म्हणजे भावाने बहिणीला दिलेली प्रेमाची ओवाळणी आहे. राज्यातील 6 कोटी 11 लाख महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहिण मानले आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील सावत्र भावांना प्रचंड पोटदुखी झाली आहे. रांगेत उभे राहून फॉर्म भरणाऱ्या महिलांना भिकारी म्हणणे ही कुठली संस्कृती, असा सवाल वाघमारे यांनी यावेळी केला.
लाडकी बायको लाडका मुलगा
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बायको, लाडका मुलगा योजना राबवल्या. त्यांना लाडका भाऊ देखील मान्य नव्हता म्हणून बिंधुमाधव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी त्यांचे कधीच पटले नाही. तुम्हाला सख्या भावांचे नाते कळले नाही. त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेवर बोलण्याचा अधिकार नाही, असे ज्योती वाघमारे यांनी ठणकावले.
‘पॅरानॉइड स्क्रिझोफेनिया’ची लक्षणं
आतापर्यंत उबाठाची भाषणे, अंगविक्षेप, हावभाव, त्यांची भाषा, एखाद्याला धमक्या देणे, सतत शिवीगाळ करणे, तू राहीन किंवा मी राहिन अशी हिंसक भाषा वापरणे हे सगळं मानसशास्त्राच्या भाषेत ‘पॅरानॉइड स्क्रिझोफेनिया’ झाल्याची लक्षणं आहे. त्यामुळे जवळच्या व्यक्तींनी उद्धव ठाकरेंवर तातडीने उपचार करावेत , असे वाघमारे म्हणाल्या.
उद्धव यांच्यावर कवितेतून टीका
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांच्या रक्ताने शिवसेना उभी राहिली आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आयत्या पीठावर रेघोट्या ओढल्या. उद्धवचा मतांसाठी उस्मान झाला हे बोलले तर चालेल का? बाळासाहेबांनी ज्वलंत हिंदुत्व जपले तर तुम्ही हिरवे साप गळ्यात घालून मिरवत आहात. “तुमच्या राजकारणावर आलीय जोरदार टाच…. आणि म्हणूनच तुमचा मुलगा करत होता अंबानीच्या लग्नात नाच… जर आला असेल तुम्हाला माज…तर येत्या निवडणुकीत जनता जिरवेल तुमची खाज…. जनाची नाही तर थोडी मनाची तरी बाळगा लाज…” या ओळींमधून त्यांनी उबाठावर जोरदार टीका केली.