महाराष्ट्र

Nitin Gadkari : लोकांची कामे करा, नाहीतर नोकरी गमवाल!

Nagpur : गडकरी भडकले; अधिकाऱ्याला म्हणाले, 'हफ्ता सुरू आहे का?'

Janata Darbar : शहरात एवढ्या समस्या आहेत. प्रत्येकवेळी समस्यांची यादी वाढत जात आहे. माझ्याकडे लोक समस्या घेऊन येतात. माझ्या कार्यालयामार्फत तुम्हाला पत्र येतं. पण तरीही लोकांच्या अडचणी काही कमी होत नाहीत. तुम्ही प्रामाणिकपणे लोकांची कामे करा, नाहीतर नोकरी गमवाल, या शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना सुनावले.

नितीन गडकरींचा जनता दरबार यंदा नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आला. नागपुरातील हजारो नागरिक आपल्या समस्या व अडचणींची निवेदने घेऊन याठिकाणी आले. महापालिकेतील कॉन्फरन्स हॉलमध्ये गडकरींनी नागरिकांची निवेदने स्वीकारली. समस्या सांगितली की लगेच संबंधित विभागातील आणि झोनमधील अधिकाऱ्याला गडकरी जाब विचारत होते. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर आले नाही तर सर्वांसमोर त्यांच्या खास शैलीत गडकरी खडसावतही होते. लोकांची कामे केली नाही तर तुम्हाला नोकरी गमवावी लागेल, असेही गडकरींनी काही अधिकाऱ्यांना म्हटले.

मनपाच्या दहाही झोननिहाय तत्काळ नियोजन करून नागरी समस्या सोडविण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे घरात पाणी शिरले, रस्त्यावर पाणी तुंबून राहिले. गटार लाईन चोक झाल्यामुळे सांडपाणी बाहेर आले, रस्त्यावर खड्डे पडले अशा दीड हजाराहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व समस्यांचे मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाद्वारे झोन निहाय तपासणी करून अहवाल सादर करा, असे निर्देशही गडकरींनी आयुक्तांना दिले.

यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व अजय चारठाणकर, यांची उपस्थिती होती. याशिवाय सर्व झोनचे अधिकारी देखील उपस्थित होते.

नागपुरातील विविध भागातील नागरिक आपल्या अडचणी घेऊन पोहोचले. यावेळी गडकरींनी विधानसभानिहाय नागरिकांची निवेदने स्वीकारली. कुणी पाण्याची समस्या, कुणी ड्रेनेजची, तर कुणी रस्त्यांच्या समस्या घेऊन आले. समस्या सोडविण्यात कोणत्या अडचणी येत आहेत, याची माहिती गडकरींनी अधिकाऱ्यांकडून तिथेच घेतली. त्यानंतर कायदेशीर बाबी तपासून लवकरात लवकर नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे गडकरींनी अधिकाऱ्यांना सांगितले.

‘यांचा हफ्ता सुरू करा हो!’

जनता दरबारमध्ये एका उपायुक्तांची गडकरींनी चांगलीच फिरकी घेतली. नागरिकांच्या समस्यांवर सुनावणी करताना गडकरींनी त्या अधिकाऱ्याला ‘काय साहेब, हफ्ता सुरू आहे का?’ असा सवाल केला. त्यावर त्या अधिकाऱ्याने ‘नाही साहेब’ असे उत्तर दिले. अधिकाऱ्याचे उत्तर ऐकून जोरदार हशा पिकला. गडकरी म्हणाले, ‘अहो यांचा हफ्ता सुरू करा हो लवकर, असा कसा बंद झाला?’. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने ‘मी हफ्ता घेत नाही असे मला सांगायचे होते’ असे सांगितले आणि विषय थांबला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!