BJP News : काही लोकांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे मराठा समाजाची मुले वंचित राहणार आहेत. त्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळणार नाही. राज्याच्या पोलिस भरती प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून मराठा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत ज्या सवलती चालू आहेत त्या सुरू राहणे गरजेचे होते. ईडब्लूएस आरक्षण आहे. यात मराठा समाज 90 ते 95 टक्के लाभ घेत होता. हे सुरू राहावे असे सांगत होतो. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी प्रश्न निर्माण केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या ईडब्लूएसचा लाभ मराठा समाजातील तरुण घेऊ शकले नाहीत, असे दरेकर म्हणाले.
आर्थिकदृष्टीने दुर्बल घटकांसाठी असलेले आरक्षणही मराठा समाजाच्या हातून गेले आहे. मनोज जरांगे पाटील यांनीच ही भूमिका घेतली होती. त्यामुळै मराठा तरुणांचे झालेले नुकसान कोण भरून देणार आणि याची जबाबदारी कोण घेणार? अशी विचारणा दरेकरांनी केली. अडेलतट्टूपणाचा काय उपयोग झाला, असा प्रश्नही त्यांनी केला. आता मराठा समाजाच्या मुलांना ईडब्ल्यूएसच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांचे ढोंग लोकांसमोर उघड होत आहे, असे दरेकर म्हणाले.
मराठ्यांचे मोठे नुकसान
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले होते. ते कुठल्याही प्रकारे कोर्टाने फेटाळलेले नाही. त्या आरक्षणाची अंमलबजावणीही पोलिस किंवा सरकारी नोकरभरतीत झाली. त्यात दहा टक्के मराठा समाजाची मुले दाखल झालीत. सगेसोयरे, नोंदणी, इतर विषय क्लिष्ट झाले. त्यातून मुलांचे ईडब्ल्यूएसचे नुकसान झाले. आरक्षणाचा प्रश्न धगधगतच राहावा असे काहींना वाटत आहे. त्यातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु यातून संपूर्ण मराठा समाजाचे नुकसान होणार आहे.
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणाले, सुधीरभाऊ आमचे सर्वात सक्रिय मंत्री
शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांचाही दरेकरांनी समाचार घेतला. बाळासाहेब ठाकरे आणि भाजपने एकत्रितपणे हिंदुत्वाची ध्वजा खांद्यावर घेतली. त्यादृष्टीने काम केले. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी बेईमानी केली. भाजप आणि शिवसेना एकत्र हिंदुत्वाच्या भूमिकेवर निवडून आली. शिवसेना काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसली. राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी केली. हिरव्यांचा आधार घेऊन मते मिळाल्यामुळे हिंदुत्वद्वेष्टे झात्याचेही दरेकर म्हणाले. संजय राऊत यांना सकाळ होताच गरळ ओकायची सवय आहे. त्यानुसार ते रोज एखादा मुद्दा काढत असतात, असे ते म्हणाले. ठाकरे गटाचे चिन्ह मशाल आहे. ही मशाल कोणाच्या हातात आहे, ते त्यांनी तपासावे. हाताच्या साहाय्याने लावलेल्या मशालीने कोण तुतारी वाजवत आहे, याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. अजित पवार स्पष्ट वक्ते आहेत. त्यांच्यावर जे आरोप केले, त्याचे खुले आव्हान त्यांनी दिले आहे. आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करावे. अन्यथा आव्हान स्वीकारत राजीनामा द्यावा. राहुल गांधी यांनी बेताल, बिनबुडाचे वक्तव्य करू नये, असेही दरेकर यांनी नमूद केले.