महाराष्ट्र

Congress : भाजपने मनुवादी वृत्ती दाखवली

Rahul Gandhi : नाना पटोले यांचा अनुराग ठाकूर यांच्या विधानावरून आरोप

Nana Patole : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला. त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेतच्या विचारधारेतून आलेल्या भाजपच्या अनुराग ठाकूरांनी ‘ज्यांच्या जातीचा पत्ता नाही, ते जातनिहाय जनगणेची मागणी करत आहेत’ असे विधान केले. यातून भाजपची मनुवादी वृत्ती दिसते, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

अनुराग ठाकूर यांनी देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान करून भाजपची मनुवादी वृत्ती दाखवली आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायाच्या लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. भाजपने कितीही विरोध केला तरी देशात जातनिहाय जनगणना होणारच, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीतील मित्र पक्ष जातनिहाय जनगणना करण्यास कटिबद्ध आहेत. परंतु, भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

नाना पटोले म्हणाले, ‘भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी आपल्या पक्षाच्या मनुवादी वृत्तीचे प्रदर्शन केले. भारतातील ८० टक्क्यांहून अधिक बहुजन समाजाचा अवमान केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भाजपच्या या मनुवादी वृत्तीचा निषेध करत आहे. जात व धर्माच्या आधारावर राजकारण करणे हाच भाजपाचा अजेंडा आहे. लोकसभेच्या सभागृहात विरोधी पक्षनेत्याची जात विचारणारे लोक त्याच विचारसरणीचे आहेत, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक नाकारला होता.’

Amol Mitkari : हल्ल्यानंतर आईची प्रकृती बिघडली

हे तेच लोक आहेत

याच विचाराच्या लोकांनी संत तुकाराम महाराज, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, प्रबोधनकार ठाकरे, या थोर महापुरुषांच्या कार्यात विघ्न आणले. ज्या समाजसुधारकांनी, महापुरुषांनी समाजातील वंचित, दलित, दीन दुबळ्यांचा आक्रोश मांडला, त्या सर्वांना अपमान, छळ, अश्लाघ्य टीकेला सामोरे जावे लागले. आज २१ व्या शतकातही ही मनुवादीवृत्ती कायम असल्याचे अनुराग ठाकूर यांनी दाखवून दिले, असा आरोप पटोले यांनी केला.

पंतप्रधान समर्थन कसे करतात?

अनुराग ठाकूर यांच्या समर्थनार्थ ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनुवादाचे समर्थन केले आहे. पंतप्रधानांचे हे कृत्य अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यापेक्षा अधिक गंभीर आहे. संविधानाची शपथ घेऊन देशाच्या पंतप्रधानपदावर बसलेली व्यक्ती मनुवादाचे आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन कसे काय करू शकते? देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती जात धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्या विधानाचे समर्थन करते, हे देशाचे दुर्दैव आहे. संविधान समोर नतमस्तक होऊन शपथ घेणारे देशाचे पंतप्रधान खोटारडे आहेत, हे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, अशी टीका त्यांनी केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!