महाराष्ट्र

BJP President : मोदी-शाहंची फडणवीसांच्या नावाला पसंती

Devendra Fadnavis : नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या शर्यतीत सगळ्यात पुढे

National Politics : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव अचानक भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा हे देखील या नावासाठी सहमत असल्याचे सांगण्यात येत आहे. फडणवीस यांनी नवी दिल्लीत (New Delhi) अचानक नरेंद्र मोदी यांची आपल्या परिवारासह भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात फडणवीसांच्या नावाने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या सगळ्यात जवळ असलेले फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार, असे सतत बोलले जाते. मात्र आपण राज्यातच आनंदी असल्याचे फडणवीस यांनी सांगत या सर्व शक्यता सतत नाकारली. आता पुन्हा एकदा त्यांच्या नावाने मुंबईतून दिल्लीत जाण्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

फडणवीस यांनी यासंदर्भात अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. नवी दिल्लीत पंतप्रधानांची (PM Narendra Modi) कुटुंबासह त्यांनी भेट का घेतली, याची उत्सुकताही अद्याप कायम आहे. यासंदर्भात स्वत: फडणवीस प्रतिक्रिया देत नाही, तोवर चर्चांचा वेग कायम राहणार आहे. फडणवीस यांनी अनेक राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी काम केले. गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी झालेल्या सत्तापरिवर्तनामागे फडणवीस यांची भूमिका होतीच. त्यामुळे पक्षनेतृत्वाला फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. आपल्या कामातून ते पक्षनेत्यांच्या जवळचे व विश्वासू झाले आहेत.

पराभवाकडे दुर्लक्ष

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) भाजपचा जवळपास पराभवच झाला. निकालांनंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ केला. मात्र तो नाकारण्यात आला. पक्षसंघटनासाठी काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र फडणवीस सरकारमध्ये असतील तर महाराष्ट्राच्या पदरात दिल्लीतून बरेच काही पाडून घेता येते, असे अनेकांचे म्हणणे होते. अशात फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राला मोठा फायदा होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात भाजपजवळ सध्या मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम चेहरा नाही. फडणवीस हाच महाराष्ट्र भाजपसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहे. परंतु जेव्हा जेव्हा फडणवीस सत्तेत आलेत, तेव्हा तेव्हा राज्यात आंदोलनांची मालिका सुरू झाली. फडणवीसांना होणारा विरोध सतत वाढतच आहे. अशात ते महाराष्ट्रातून दिल्लीत गेल्यास अनेकांचा मार्गही मोकळा होणार आहे. अमित शाह यांना मोदींचे चाणक्य म्हटले जाते. अगदी त्याच पद्धतीने फडणवीस हे राज्याच्या राजकारणातील चाणक्य असल्याचे बोलले जाते. परिणामी त्यांच्या चौफेर खच्चीकरणासाठी विरोधकांचे प्रयत्न अव्याहतपणे सुरूच असतात. त्यामुळे फडणवीस यांचे नाव दिल्लीसाठी खरोखर चर्चेत आहे की, ते जाणीवपूर्वक पेरण्यात आले, याबद्दलच साशंकता आहे.

खरच ओव्हरलोडेड

फडणवीस हे केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नाहीत. ते महाराष्ट्राचे गृहमंत्री देखील आहेत. विधि व न्याय, जलसंपदा, ऊर्जा असे विभागही त्यांच्याकडे आहेत. महायुतीचे (Mahayuti) सरकार आले त्यावेळी ते सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री होते. कालांतराने त्यांनी काही जिल्ह्यांचा भार कमी केला. परंतु फडणवीस खरच बदलल्याची चर्चा होऊ लागली. पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तोपर्यंत फडणवीस स्वत: अनेक एसएमएसला प्रतिसाद द्यायचे. त्यांना शक्य न झाल्यास त्यांच्या टीममधून कोणीतरी प्रतिसाद द्यायचे. मात्र अलीकडच्या काळात फडणवीस हे प्रतिसाद देईनासे झालेत. त्यांच्या टीमने तर लोकांशी संपर्कच ठेवणे बंद केले. चहापेक्षा बरेचदा केटली गरम असते तशातील प्रकार आता होत आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसार माध्यमांमध्येही मुलाखतीत सांगितले आहे. फडणवीस खरच ओव्हरलोडड आहेत, यात शंकाच नाही. परंतु त्यांच्या टीमने जनसंपर्क कायम ठेवणे अपेक्षित आहे. याचा पक्षालाही फायदाच होतो.

Amol Mitkari : हल्ल्यानंतर ठिय्या; एलसीबीवर गंभीर आरोप

ओव्हरलोडेड असल्यामुळेच कदाचित लोकसभा निवडणूक काळात पक्षाकडे दुर्लक्ष झाल्याची जाणीव फडणवीस यांना झाली असावी. आपल्याकडे असलेल्या विविध खात्यांचे कामकाज, सरकारी बैठकीचे सत्र, पालकमंत्री म्हणून जिल्ह्यांची जबाबदारी, मतदारसंघाकडे लक्ष, सतत चालणाऱ्या आंदोलनांमुळे ऐनवेळी निर्माण होणारे प्रश्न अशा साऱ्याच आघाडीवर फडणवीस यांना एकट्याने लढावे लागते. मुंबई आणि दिल्लीतील खरा दुवा तेच आहेत. त्यामुळे त्यांना कदाचित समतोल साधणे अवघड होत असावे. त्यातूनच त्यांनी पक्षसंघटनाची संधी मागितल्याचे दिसते. फडणवीस यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडले जाईल की नाही, हे अद्याप कोणालाही ठाऊक नाही. परंतु यामुळे नितीन गडकरी यांच्यानंतर नागपूरच्या नेत्याचे नाव पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी स्पर्धेत आले आहे. फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेच तर विदर्भाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाऊ शकतो.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!