महाराष्ट्र

Pune News : आमदाराच्या विरोधात ‘लाडक्या बहिणी’ पोलिसात

Siddharth Shirole : अखेर व्यक्त केली दिलगिरी; बॅनरबाजी भोवली

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. ही योजना सध्या सर्व पातळ्यांवर चर्चेत आहे. यावरून सुरू असलेले राजकारण तर सर्वसामान्यांसाठी आता डोकेदुखी ठरत आहे. अश्यात पुण्यातील एका आमदाराच्या विरोधात लाडक्या बहिणी पोलिसात गेल्या. प्रकरण असे काही गाजले की शेवटी त्या आमदाराला दिलगिरी व्यक्त करावी लागली.

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना महिन्याकाठी 1500 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. हा मुद्दा कॅश करण्यासाठी महायुतीमधील राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी योजनेची घोषणा केली म्हणून राष्ट्रवादी क्रेडिट घेत आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या नावाने योजना असल्याने शिवसेना क्रेडिट घेत आहे. त्यातही भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून कुठेच मागे नाही. मात्र ही चढाओढ पुण्यातील एका भाजपच्या आमदाराला चांगलीच अंगलट आल्याचे दिसून आले.

पुण्यातील शिवाजी नगर परिसरात भाजप आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी लावलेल्या बॅनरवरुन चांगलाच वाद निर्माण झाला. या बॅनरवरुन महिलांनी थेट आमदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसघांत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या बॅनरवर सहमती शिवाय आमचा फोटो लावल्याची तक्रार या महिलांनी केली आहे. बॅनरवर झळकलेल्या महिला पोलिसांत पोहोचल्या आणि आमदारा चांगलाच गोंधळ उडाला. अखेर दिलगिरी व्यक्त केल्यावर प्रकरण शांत झाले.

आम्हाला विचारलेच नाही

भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेचे बॅनर लावले आहेत. त्या बॅनरवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आमदार सिध्दार्थ शिरोळे यांचाही फोटो आहे. मात्र, या नेत्यांच्या फोटोसह दोन महिलांचे फोटो देखील बॅनरवर लावले आहेत. या बॅनरवर झळकलेल्या महिलांपैकी एकीचं नाव नम्रता अंकुश कावळे तर दुसरीचं नाव भागीरथी माणिक कुरणे असं आहे. या दोन्ही महिलांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो बॅनरवर लावण्यात आल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. विशेष म्हणजे आमदाराने संमतीशिवाय योजनेच्या जाहिरातीवर आपले फोटो लावल्याने महिलांनी थेट पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली.

आमदार शिरोळेंनी व्यक्त केली दिलगिरी

दरम्यान, आमदार शिरोळे यांनी या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. कोणाच्या दुखवण्याची आमची भावना नाही. ही योजना महिलांसाठी आहे, आमचा हेतू वाईट नाही, योगायोगाने हा फोटो त्या बॅनरवर आला आहे. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशी भावना आमदार शिरोळे यांनी या पोलीस तक्रारीनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. मात्र, आमदार शिरोळे यांनी झळकावलेले बॅनर आणि त्यावरुन सुरू झालेल्या वादाची चंगलीच चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

1 कोटी अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभर चलती आहे. या योजनेसाठी आत्तापर्यंत तब्बल 1 कोटी महिलांना आपला अर्ज दाखल केला आहे. राज्य सरकारकडून 19 ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे, या योजनेसाठी शासकीय स्तरावर अर्ज भरले जात आहेत. लोकप्रतिनिधी शिबीर भरवत आहेत. विविध माध्यमांतून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनींना आवाहन केलं जात आहे. मात्र, अशाप्रकारे महिलांना लाडकी बहीण योजनेचं आवाहन करणं भाजप आमदाराच्या अंगलट आलं आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!