Chandrapur News : राजकीय नेत्यांचे मोठ्या प्रमाणावर चाहते असतात. हे चाहते व समर्थक आपल्या नेत्यासाठी नेहमीच काही ना काही करण्याची धडपड करीत असतात. अशात आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस अशा समर्थकांसाठी उत्सवापेक्षा कमी नसतो. आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी प्रसंगी ते अनेक किलोमीटरचे अंतर पार करून जातात. असाच प्रत्यय राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मंगळवारी (ता. 30) आला.
सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस असल्याने मंगळवारी सकाळपासूनच शुभेच्छा देणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. अशात बीडच्या एका कार्यकर्त्यांने चंद्रपुरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चाहत्याने मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बत 14 फुटांचा पुष्पहार आणला होता. क्रेनच्या मदतीने हा हार मुनगंटीवार यांना घालण्यात आला. आगळेवेगळे काम करणारा नेता म्हणून मुनगंटीवार यांचे नावलौकिक आहे. नेता असा म्हटल्यावर कार्यकर्ताही आगळेवेगळे काम करणारच ना! हा हार घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव योगेश भागवत असे आहे. भागवत बीडहून चंद्रपूरला आले होते.
समाजकार्याला सुरुवात
सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यापासून प्रेरीत होत भागवत यांनी समाजिक कार्यालया सुरुवात केली. बीडमध्ये त्यांनी सुधीर मुनगंटीवार युवा प्रतिष्ठानची स्थापना केली. गेल्या पाच वर्षांपासून ते या प्रतिष्ठानच्या माध्यमातून बीडमध्ये (Beed) समाजकार्य करीत आहेत. मंगळवारी मुनगंटीवार यांचा वाढदिवस असल्याचे चंद्रपुरात पोहोचले. 14 फुटांच्या पुष्पहारासह. महाकाय हार लोकांच्या हातांनी उचलणे शक्य नव्हते. त्यामुळे भागवत यांनी क्रेनही आणली. चंद्रपुरातील गिरनार चौकात सोमवारी (ता. 29) रात्रीपासून ते तयारीला लागले.
भागवत यांच्या मदतीला रीतेश ढगे, राजेंद्र करपे, संदीप पाटील, रवींद्र येसेकर, संदेश शालीवार, शशिकांत नक्षिणे हे देखील होते. रात्रभर भागवत आणि त्यांच्या सहकार्यांनी क्रेन आणणे, कार्यक्रमस्थळाची सजावट करणे आदी काम केले. मुनगंटीवार येण्याच्या काही वेळापूर्वी महाकाय पुष्पहार क्रेनवर चढविण्यात आला. ‘भाऊ’ येताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना हा हार घालत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी केलेली ही प्रेमाची पुष्पवृष्टी अनुभवल्यानंतर मुनगंटीवारही भारावून गेले. जनता व कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या याच प्रेमामुळे आपल्या काम करण्याची ऊर्जा मिळते, असे ते यावेळी म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांना मंगळवारी देशविदेशातील राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, बॉलीवूड स्टार यांनी शुभेच्छा दिल्या. सकाळपासूनच त्यांच्या चाहत्यांची गर्दी चंद्रपुरात झाली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. या साऱ्यांमध्ये लक्षवेधी ठरले ते सुधीर मुनगंटीवार युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी.