Political Conspiracy : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दयेच्या आधारावर नव्हे तर मेरीटच्या आधारावर जामीन देण्यात आला आहे. देशमुख यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आधी हा निकाल वाचून घ्यावा. त्यांनी आम्हाला सांगू नये की, आम्ही प्रचार करावा की अन्य काही करावे. दबावाचे राजकारण करून त्यांनी आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही, असे विधान अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी केले. सलील यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर खुलासा केला.
चौकशी एजन्सीमधील अधिकाऱ्यांनी आपल्या सहा वर्षाच्या मुलीशीही गैरवर्तन केले. तिचा हात ओढला होता. या अधिकाऱ्यांची नावेही आपल्याला ठाऊक आहेत. योग्य वेळी आली ती त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं मिळतील. अनिल देशमुख यांना मिळालेल्या जामिनाचा निकाल इंटरनेटवर आहे. तो टीका करणाऱ्यांनी वाचावा असा सल्लाही सलील यांनी दिली. भाजपचे आमदार तथा माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी काही दिवसांपूर्वी देशमुख यांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. देशमुख वैद्यकीय कारणामुळे जामिनावर आहेत. त्यांची प्रकृती उत्तम दिसत आहे. त्यामुळे त्यांचा जामिन कोर्टाने रद्द करावा, असे डॉ. फुके म्हणाले होते. त्यांना सलील यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले.
प्रचंड दबावाचा वापर
आमच्या घरावर अधिकाऱ्यांनी 130 छापे घातले. परंतु काहीच आढळले नाही. आपलीही जामिनावर मुक्तता झाली आहे. आपल्या पत्नी विरोधातही समन्स आहेत. आईविरोधात समन्स आहेत. भावाविरोधात समन्स आहेत. देशमुख परिवाराशी संबंधित अनेक व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आताही अनिल देशमुख यांना पुन्हा जेलमध्ये टाका असे सांगण्यात येत आहे. देशमुख यांना कोर्टाने मेरीटच्या आधारावर जामिन दिला आहे. त्यांना आत टाका असे म्हणायला मोगलाई किंवा पेशवाई लागलेली नाही, असे देशमुख म्हणाले. भाजप नेते आशिष देशमुख यांच्यावर भाष्य करणे सलील यांनी टाळले. महान लोकांवर आम्ही बोलत नाही, असे ते म्हणाले.
समित कदमला आपण व्यक्तीश: ओळखत नाही. परंतु त्याच्यासंदर्भात अनिल देशमुख यांनी खुलासा केला आहे. ज्यावेळी कारवाई झाली त्यावेळीही प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आजही दबाव आणण्यासारखेच प्रकार सुरू आहेत. परंतु आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही. आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत. तीन वर्षांनंतर या प्रकरणावर अनिल देशमुख बोलत आहेत, त्याला काही कारण आहे. पण ‘आता बात निकली है तो दूर तक जाएगी. सच कह दुंगा तो उसकी सुलग जाएगी’ अशा शब्दात सलील यांनी देशमुखांजवळ असलेल्या पुराव्यांबाबत उल्लेख केला.