महाराष्ट्र

Eknath Shinde : नीती आयोगातून महाराष्ट्राला लाभ

Neeti Aayog : रेल्वेमार्ग, मेट्रो, फनेलसंदर्भात चर्चा

Modi Government 3.0 : नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळुण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समूह विकाससारख्या पायाभूत प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत हे मुद्दे मांडले. प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारकडून सहकार्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे केली. राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीत शिंदे यांनी महाराष्ट्र शासनातर्फे योजनांविषयी माहिती दिली.

क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसर क्षेत्राचा विकास होणार आहे. राज्यातील इतर भागांमध्ये जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी पुनर्विकास योजना सुरू आहे. हा आशियातील सर्वांत मोठा ब्राउनफिल्ड प्रकल्प आहे. ही योजना नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. मुंबईतील झोपडपट्ट्या, मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास राज्य सरकारच्या संस्थांमार्फत होणार आहे. या संस्थांमार्फत दोन लाखांहून अधिक घरे बांधण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वेगाने विकास

कोकण कोस्टल रोड आणि कोकण ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे कोकणासाठी महत्वाकांक्षी ठरणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी पाच हजार किलोमीटरचे अॅक्सेस कंट्रोल ग्रीड तयार होणार आहेत. मुंबई महानगर परिसरात सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या सुमारे 390 किलोमीटरच्या मेट्रो मार्गांचे बांधकाम सुरू आहे. पुणे आणि नागपूर येथे मेट्रो मार्गाचे कामही वेगाने सुरू आहे. नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या कामाला तातडीने सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. बैठकीत मुंबईतील फनेल झोनसंदर्भात चर्चा झाली. त्याची उंचीची मर्यादा, रडार स्थलांतर करणे याबाबत चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बीपीटीच्या सहा एकर जागेचा चांगला वापर करून तेथे मरीन ड्राईव्हसारखी चौपाटी विकसित करण्याबाबतही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विरोध करणारे सावत्र भाऊ

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, विरोधकांच्या पोटात आता दुखायला सुरूवात झाली आहे. आम्ही लाडकी बहीण योजना आणली. त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही. लाडक्या बहीणींना विरोध करणाऱ्या या सावत्र भावांना लवकरच जनता धडा शिकवेल. विरोधकांना जेव्हा संधी होती, तेव्हा त्यांनी अनेक वर्ष मराठा समाजाला न्याय दिला नाही. महायुती सरकारने मराठा समाजाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. याचा विचार मराठा समाजातील युवकांनी केला पाहिजे. कुणीही राजकीय फायद्यासाठी कुठल्याही समाजाला वेठीस धरता कामा नये. स्वतःच्या फायद्यासाठी कोणीही कोणत्या समाजाचा वापर करू नये, असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!