प्रशासन

Crime News : कृष्णाच्या मारेकऱ्याचे वकीलपत्र घेणार नाही!

Buldhana : शेगाव बार असोसिएशनचा निर्णय; एकमुखी निर्णयातून घेतला ठराव

शेगाव येथील नागझरी गावात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीचे वकीलपत्र कुणीही घ्यायचे नाही, असा निर्णय शेगाव बार असोसिएशनने घेतला आहे. शेगावात दिवाणी न्यायालयात काम करणाऱ्या सर्व वकिलांनी असोशिएशनच्या माध्यमातून तसा एकमुखी ठरावच केला आहे.

शेगाव तालुक्यातील नागझरी येथील १४ वर्षीय कृष्णा राजेश्वर कराळे हा २३ जुलैपासून बेपत्ता होता. मंगळवारी सकाळी १० वाजता शिकवणी वर्गासाठी तो बाहेर पडला होता. दरम्यान, २३ जुलै रोजी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी कृष्णाला एक संशयित मोटारसायकलवरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. संशयिताच्या मोबाइलचे लोकेशन घेण्यात आले. आरोपी रुपेश वारोकार (२२, रा. नागझरी) याला २४ जुलै रोजी सायंकाळी जळगाव जामोद येथे ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केली असता अपहरण झालेल्या कृष्णाची हत्या झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. हत्येच्या कटात सामील पृथ्वीराज मोरे (२१, रा. नागझरी) यालादेखील अटक करण्यात आली.

दरम्यान शेगाव बार असोशिएशनने शुक्रवारी (दि.२६) शेगाव येथील दिवाणी न्यायालयातील कार्यालयात महत्त्वाची बैठक आयोजित केली. यामध्ये कृष्णाच्या हत्येसंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर शेगावच्या वकील संघटनेने भूमिका घेत संघटनेतील कोणतेही वकील आरोपीच्या वतीने वकीलपत्र दाखल करणार नाहीत. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आरोपीला मदत करणार नाहीत, असा एक मताने ठराव केला. त्याचवेळी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

वकिलांचा ठराव

कृष्णाचे अपहरण करून हत्या करण्याचा प्रकार अतिशय निंदनीय आहे. अशा अपराधिक प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना योग्य तो संदेश द्यावा लागेल. त्यामुळे शेगाव वकील संघटनेने या प्रकरणामध्ये संघटनेतील कोणतेही वकील सदस्य त्यांचे वकीलपत्र आरोपीच्या वतीने दाखल करणार नाहीत. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आरोपीला मदत करणार नाहीत, असा ठराव केला.

कठोर भूमिका

शेगाव वकील संघटनेने गुन्ह्याचा निषेध म्हणून कठोर भूमिका घेतलेली आहे. तसेच सदर प्रकरणाचा तपास योग्यरीतीने व शीघ्र गतीने करून सदर प्रकरणात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनात केली आहे, असे संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कैलास गुप्ते यांनी सांगितले.

आरोपींना पोलीस कोठडी

कृष्णा कराळे या विद्यार्थ्यांवर शुक्रवारी (दि.२६) नागझरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या दोन्ही आरोपींना ३० जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात आली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!