Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणूक निकालाचे अवलोकन करून अनेक राजकीय पक्षांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही असेच बदल पक्षाच्या कार्यप्रणालीत केलेत. लोकसभा निवडणुकीत दादांना ‘टाइम’ने साथ दिली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी दादांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षकार्याला ‘चावी भरली’ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचे सेल आता फुल चार्ज करण्यात आले आहेत. केवळ पक्षातच हे बदल करण्यात आलेले नाहीत. तर दादांच्या लुकमध्येही बदल झाला आहे. सध्या यत्र, तत्र, सर्वत्र दादांच्या या बदलाचीच चर्चा आहे.
राजकीय सल्लागार नरेश अरोरा (Naresh Arora) यांना दादांनी आपल्या टीममध्ये घेतले आहे. अरोरा हे वेगवेगळे सल्ले देऊन दादांची चांगली ‘वेळ’ यावी यासाठी कालचक्राचे काटे फिरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार पक्षाच्या कार्यप्रणालीत काही बदलही करण्यात आले आहेत. दादा सध्या अनेक मतदारसंघांचा दौरा करीत आहेत. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात ज्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे, त्या जिल्ह्यांवर जोर देण्यात येत आहेत. दादा पूर्वी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सत्ताकाळात उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी विधानसभेत बोलताना आम्हाला विदर्भात फारसे यश मिळत नाही, असे नमूद केले होते. हे भाजप आणि शिवनेसा (शिंदे गट) विसरलेले नाहीत, हे महत्त्वाचे.
विदर्भावर फोकस कमी
दादांच्या राष्ट्रवादीचा फोकस सध्या विदर्भावर कमी आहे. दादांचे दौरेही पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे. याचा अर्थ ते विदर्भात अजिबातच येणार नाहीत, असेही गृहित धरता येणार नाही. पण सध्या ते बलस्थानांवर जोर देत आहेत, असे दिसते. सल्लागाराने सांगितल्याप्रमाणे दादांनी आता मवाळ हिंदूत्वाची कास धरली आहे. दादांचे वक्तव्यही त्यादृष्टीने सावध आणि सर्वधर्म समभाव पद्धतीचे येत आहेत. याशिवाय दादांनी अलीकडेच पक्षाला आणि स्वत:ला गुलाबी रंगात सामावून घेतले आहे. पिंक अर्थात गुलाबी रंग महिलांशी संबंधित असल्याचे सांकेतिक रंगभाषेत मानले जाते. पुरुषांसाठी निळा रंग वापरात आहे. सध्या महाराष्ट्राचे राजकारण नारीशक्तीभोवती फिरत आहे.
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) धर्तीवर महाराष्ट्रात महिलांचे मतदान हा निर्णायक ‘फॅक्टर’ ठरणार आहे. कुटुंबातील लोकांचे मतपरिवर्तन घरातील स्त्री करू शकते असे मानसशास्त्रातही सांगण्यात आले आहे. त्यामुळे महिला मतदारांना जास्तीत जास्त कसे आकर्षित करता येईल, याचा प्रयत्न महायुती (Mahayuti) करीत आहे. अलीकडेच दादांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. ही योजना जरी राज्य सरकारची असली तरी त्याचा प्रचार सध्या दादांच्याच नावाने सुरू आहे. दादांनीच ही योजना तयार केली. दादांनीच योजना जाहीर केली. दादाच पैसे देणार आहेत, असा प्रचार सर्वत्र सुरू आहे. याच्या जोडीला गुलाबी रंगही देण्यात आला आहे. महिला मतदारांना हा गुलाबी रंग आपलासा वाटावा आणि अजितदादा आपलेही भाऊ वाटावे, असा विचार त्यामागे असावा.
परिवर्तन संसार का नियम
राजकीय नेते किंवा पक्ष यांच्यातील बदल नवे नाहीत. गरजेनुसार, ज्योतिष्यांच्या सल्ल्यानुसार अनेक जण बदल करतात. माजी मुख्यमंत्री जयललिता या धर्म, आध्यात्म, ज्योतिष्यविद्या याला प्रचंड मानायच्या. भाजपच्या दिवंगत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराजही अशा ‘टीप्स’ फॉलो करायच्या हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे. मनसेने अनेकदा आपले इंजिन डावीकडे, उजवीकडे फिरविले आहे. काही नेत्यांनी अंकशास्त्राप्रमाणे आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्येही बदल केले आहेत. काहींनी राजकीय रणनीतीकारांच्या सल्ल्यानुसार स्वत:च्या व पक्षाच्या भूमिका वेळोवेळी बदलल्या आहेत. दादांमधील बदल हा धर्म, आध्यात्म, ज्योतिष्य यांच्याशी संबंधित वाटत नाही. तो काळानुसार व गरजेनुसार झालेला दिसत आहे. ‘परिवर्तन संसार का नियम है’ असे आपण म्हणतोच. त्यामुळे गरजेनुसार दादांनीही हा बदल केलेला दिसतो.
सध्या दादांचा महाराष्ट्रातील वावर ‘गुलाबी जॅकेट आणि काम छान छान’ असा आहे. दादांनी केवळ वेशभूषेत बदल केला नाही, तर त्यांच्या कामाचा, जनसंपर्काचा वेगही वाढल्याचे दिसत आहे. दादांनी सध्या संपूर्ण लक्ष पश्चिम महाराष्ट्रावर केंद्रीत केले आहे. कार्यकर्ता मेळावा, जनसंपर्क शिबीर, अधिकाऱ्यांच्या बैठका यावर ते जोर देत आहे. कोणत्याही वादात अडकायचे नाही, असा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. पुणे विभागात (Pune) अतिवृष्टी झाली. अनेक भाग पाण्यात बुडाले. त्यानंतर दादा स्वत: पालकमंत्री म्हणून ‘फ्रंटफूट’वर आलेत. अनेक जिल्ह्यांमधील पालकमंत्री गायब आहेत. त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर ओरड होत आहे. त्यामुळे आधीच जबाबदारीने वागणाऱ्या दादांनी पालकमंत्री म्हणून आणखी आव्हान स्वीकारले.
दादांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीमध्ये झालेला बदल निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. महायुतीमधील शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) देखील वेगवेगळ्या पातळीवर प्रचार करीत आहे. पण सध्या राज्यभरात दादांचा लुक आणि कामाची पद्धत याने लक्ष वेधून घेतले आहे. काही होवो अगर न होवो आपल्या नेत्याचे नाव सतत चर्चेत राहिले पाहिजे असा कोणत्याही राजकीय रणनीतीकाराचा प्रयत्न असतो. नेतेही असाच प्रयत्न करीत असतात. दादांच्या गुलाबी लुकमुळे कोणताही वाद निर्माण न होता त्यांच्या नावाची सकारात्मक चर्चा राज्यभर होणे हे संबंधित रणनीतीकार आणि नेता या दोघांचेही यशच म्हणावे लागेल. त्यांचे हे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसला आकर्षक वाटणारा यशाचा गुलाबी रंग कसे मिळवून देतात, हे येणाऱ्या काळातच कळेल.