महाराष्ट्र

Maharashtra Politics : तुपकरांनंतर आता बच्चू कडू मैदानात !

Bacchu Kadu : तिसरी नव्हे कष्टकऱ्यांची आघाडी असल्याचा दावा

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीपुढे आपल्या जागा टिकविण्याचे आव्हान आहे. अश्यात राज्यात तिसरी आघाडी स्थापन होणार असल्याची चर्चा सुरू झाली. पहिले बच्चू कडू, सदाभाऊ खोत आणि आता रविकांत तुपकर आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी आपला स्वतंत्र मार्ग घोषित केला आहे. पण ही तिसरी आघाडी नसून कष्टकऱ्यांची आघाडी असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे आणि स्वाभिमानी संघटनेचे रविकांत तुपकर यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. ‘ही आमची तिसरी आघाडी राहणार नसून, शेतकरी, शेतमजूर, कष्‍टकऱ्यांची स्‍वतंत्र आघाडी असू शकते,’ असे बच्‍चू कडू यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली. पक्षांतर्गत मतभेदांमुळे ही कारवाई करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. आजपासून आमचा आणि रविकांत तुपकर यांचा काहीच संबंध नसल्याचं जालिंदर पाटील म्हणाले होते. यानंतर महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

रविकांत तुपकर यांनी पुण्यात आपल्या समर्थकांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी आपल्या नव्या धोरणांबाबत मोठी घोषणा करीत विधानसभा निवडणुकीत 25 जागा लढविणार असल्याचे सांगितले. या बैठकीनंतर रविकांत तुपकर यांनी आपला ‘महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी’ पक्ष येत्या निवडणुकीत 25 जागांवर निवडणूक लढवणार,’ अशी घोषणा केली.

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया देत 9ऑगस्टला संभाजीनगर येथे महामोर्चाची घोषणा केली. ‘या मोर्च्यानंतर राजकीय चर्चा होईल. आमची तिसरी आघाडी नसेल. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी असेल,’ असे त्यांनी स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्याशी समन्वय साधता येईल. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या नेत्यांनी सर्वांनी एकत्र असा आमचा विचार आहे, असेही ते म्हणले.

तो श्याम मानव यांचा प्रश्न आहे

जरांगेच्या आरोपांबाबत आमदार कडू पुढे म्हणाले की, ‘प्रत्येकाची राजकीय महत्त्वाकांक्षा असते, उद्देश असतात. त्यात नवल काही नाही. फडणवीस जरांगेंना जेलमध्ये टाकतील हा आरोप ठीक आहे. पण जीवाने मारतील, असा आरोप करणे संयुक्तिक नाही. श्याम मानव काय बोलले, त्याबद्दल मला माहिती नाही. श्याम मानव यांनी कोणासाठी प्रचार करावा, हा त्यांचा विषय आहे.’ सरकारकडे निधी आहेच नाही, पैसा उपलब्ध नाही, अल्पसंख्याकांना एक खडकू दिला नाही. मुस्लिम समाजासाठी बजेटमध्ये एक रुपयाची तरतूद नाही, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

शिंदे यांच्‍याकडे प्रस्‍ताव करणार सादर 

‘आम्‍ही तिसरी आघाडी निर्माण करणार नाही. राज्‍यात शेतकरी, शेतमजुरांचे अनेक प्रश्‍न आहेत. ते सोडविण्‍यासाठी प्राथमिकता ठरविण्‍याची गरज आहे. आमची शेतकरी, कष्‍टकऱ्यांची स्‍वतंत्र आघाडी राहू शकते. आम्‍ही मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे प्रस्‍ताव सादर करणार आहोत. आमच्‍या मागण्‍या त्‍यांच्‍यासमोर मांडणार आहोत. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्‍यानंतर मुख्‍यमंत्री आम्‍हाला चर्चेसाठी निमंत्रण देणार आहेत. त्‍यांच्‍याशी चर्चा केल्‍यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल. मुख्‍यमंत्र्यांनी प्रस्‍ताव मान्‍य केल्‍यास, माझा अचलपूर मतदारसंघही त्‍यांना देऊ,’ असे बच्‍चू कडू यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!