लोकसभा निवडणूक अपक्ष लढणारे ‘वन बुलढाणा मिशन’चे संस्थापक संदीप शेळके यांना डिपॉजिटही वाचविता आले नव्हते. पण त्यांनी आता नवा मार्ग निवडला आहे. शेळके यांनी मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.२३) शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला. आता शिवसैनिक म्हणूनच काम करणार, असे त्यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अश्यात शेळके यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकण्यासाठी हा मार्ग निवडल्याचे बोलले जात आहे. संदीप शेळके बुलढाणा येथील राजर्षी शाहू परिवाराचे सर्वेसर्वा आहेत. या माध्यमातून गेल्या २३ वर्षांपासून जिल्ह्यातील सहकार, शिक्षण, सामाजिक, उद्योग, महिला बचत गट यासह विविध क्षेत्रात सक्रिय आहेत. गेल्यावर्षी त्यांनी वन बुलढाणा मिशनची स्थापना केली. ‘जिल्ह्याचा सर्वांगीण विकास’ याच मुद्यावर अपक्ष लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना डिपॉजिटही वाचविता आले नाही. पराभवामुळे खचून न जाता पुन्हा नव्या दमाने शेळके कामाला लागले आहेत.
जिल्ह्याचा सर्वांगीण शाश्वत विकास करणे आणि युवकांचे प्रश्न सोडविणे उद्धव ठाकरेंनाच शक्य आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून क्रांतीची मशाल हाती घेतली, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी पक्षाचे सचिव खा. विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, महिला आघाडी जिल्हा संघटिका चंदाताई बढे, उपजिल्हा प्रमुख सुनीलजी घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, किसान सेना उपजिल्हा प्रमुख गजाननजी उबरहंडे, उप तालुका प्रमुख विजय ईतवारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नव्या इनिंगला सुरुवात
संदीप शेळके यांच्या नव्या राजकीय इनिंगला प्रारंभ झाला आहे. क्रांतीची मशाल हाती घेऊन पक्षाच्या ध्येयधोरणानुसार पुढील वाटचाल सुरु राहणार आहे. आपल्या सर्वांची साथ आणि मार्गदर्शन सदैव मिळत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत आपण एक शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अवघी 13 हजार मते
संदीप शेळके यांनी जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप आपल्याकडे असल्याचे सांगत लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन गल्लीबोळात सभा घेऊन पटवून देण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. जिल्ह्यातील विविध प्रलंबित, परंतु जनहिताचे प्रश्न जनतेच्या दरबारी लक्षात आणून दिले. परंतु एवढे करूनही संदीप शेळके यांना अवघी १३ हजार मते मिळाली.