मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाचव्यांदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधि पुणे न्यायालयाने हे वॉरंट जारी केले आहे. उपोषण सुरू असताना अटक वॉरंट जारी करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे.
मनोज जरांगे यांच्यावर एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सुनावणीसाठी हजर न राहिल्याने न्यायालयावे त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.सी.बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे. जरांगे पाटील हे सध्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण करीत आहे.
नाटकांचे प्रयोग आयोजित केले आणि पैसे दिले नाहीत, असा आरोप जरांगे यांच्यावर होता. या प्रकरणात जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत धनंजय घोरपडे (रा. वारजे) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. मात्र, आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.
तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग २०१३ मध्ये जालना येथे आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये घोरपडे यांना देण्याचे मनोज जरांगे पाटील, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी कबूल केले होते. परंतु, घोरपडे यांना पूर्ण पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता
यापूर्वी 500 रुपयांचा दंड
यापूर्वीही जरांगे यांच्याविरोधात न्यायालयात गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतर जरांगे मे अखेरीस न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने जरांगे यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच पुढील सुनावणीला हजर राहण्याच्या अटींवर वॉरंट रद्द केले. परंतु, त्यानंतरही जरांगे सुनावणीला गैरहजर राहिल्याने अखेर न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे.
काय आहे प्रकरण?
मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने 2013 साली एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर निर्मात्याला पैसे देण्यात आले नाही, असा आरोप आहे. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कलम 156 (3) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यामध्ये जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन देखील मिळाला होता.