Parliament Monsoon Session : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मंगळवारी (ता. 23) अर्थसंकल्प सादर केला. यावर आता विरोधी पक्षांकडून कडाडून टीका केली जात आहे. काँग्रेस नेत्या, खासदार वर्षा गायकवाड यांनी हा अर्थसंकल्प केवळ आणि केवळ ‘त्यांच्या’ लाडक्या मित्रांसाठी असल्याची टीका केली आहे.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कळले की, महाराष्ट्राच्या नेत्यांची दिल्लीत काय पत आहे? आमचे उद्योग जे बाहेर गेले, त्याबद्दल चकार शब्दही काढण्यात आला नाही. देशात उत्तरप्रदेशनंतर मोठे राज्य महाराष्ट्र आहे. सर्वाधिक टॅक्स केंद्र सरकारला महाराष्ट्र आणि मुंबईतून मिळतो. पण केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत सुडबुद्धीने वागते.
गद्दारीच्या राजकारणाला चालना
गद्दारीच्या राजकारणाला चालना दिली जात आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बनली का? ज्यांना ठेके दिले, त्यांनी काय केले, जनतेने हे आधी समजून घ्यायला पाहिजे. लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना नंतर येत राहतील. कारण मदर डेअरी, मिठागरे, एमएसआरडीसीची कामे, रस्त्यांचे ठेके, दत्तक वस्त्यांचे ठेके, रेसकोर्स आदी सर्व त्यांच्या मित्रांना दिले आहे. केंद्रीय बजेटच त्यांच्या मित्रांसाठी आहे. दोन वर्षांपासून आम्ही बघतोय की, लाडक्या मित्रांसाठी सरकार चाललं आहे आणि हा अर्थसंकल्पदेखील त्यांच्या मित्रांसाठीच आहे.
महिला खेळाडुंसाठी काय?
कामगार महिलांसाठी शिषूघर योजनेसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली. याव्यतिरिक्त महिसांसाठी काहीही नाही. अंगणवाडीका सेविका, मदतनीस, बचत गटांना सबळ करण्यासाठी काहीही तरतूद केलेली नाही. महिला खेळाडू असुरक्षीत आहेत. त्यासाठी अर्थमंत्री चकार शब्दही बोललेल्या नाहीत. महाविकास आघाडीचा प्रश्न आहे की, महाराष्ट्रासाठी काय दिले? राज्यासाठी काही आणू शकत नसाल, तर महाराष्ट्रातल्या सर्व सत्ताधारी खासदारांनी राजीनामे दिले पाहिजे, असे खासदार गायकवाड म्हणाल्या.
त्यांनी आमचा ध्यास घेतला
तेलंगना, कर्नाटक, राजस्थानमध्ये ज्या योजना लागू केल्या, त्याच पुन्हा पुन्हा आणल्या जात आहेत. आमच्या महालक्ष्मी योजनेचे नाव बदलून योजना आणली जात आहे. त्यांनी आमचा ध्यास घेतला आहे. दोन कोटी युवांना रोजगार देणे, 15 लाख सर्व जनतेच्या खात्यात जमा करणे, हे जुमले झाले. आता हा बजेटही जुमलाच ठरणार आहे. जनतेचा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. केंद्र सरकार केवळ आमच्या घोषणांना फ़ॉलो करत आहे.
शिंदे, पवारांनी काय केले?
केंद्र सरकारने एकही गोष्ट पूर्ण केली नाही. यांच्या गॅरंटीवर, बजेटवर कुणीही विश्वास ठेवत नाही. येत्या अधिवेशनात आम्ही यावर बोलू, आमचे प्रश्न मांडू. या बजेटसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांचा आम्ही निषेध करतो. उत्तर प्रदेशनंतर सर्वात मोठे राज्य महाराष्ट्र आहे. बजेटमध्ये मुंबईचा साधा उल्लेखही नाही. चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार यांना खुष करण्यासाठी आजचे बजेट आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी गद्दारी करून भाजप सरकारला पाठिंबा दिला, सत्तेत सामील झाले. मग त्यांनी तरी महाराष्ट्रासाठी काहीतरी खेचून आणायला पाहिजे होते. पण त्यांनीही काही केले नाही, असा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.