Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजित विधानसभा निवडणुकीत दोनशे मतदारसंघांमध्ये धावणार आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पक्षमेळाव्यात त्यांनी जवळपास 215 जागांवर उमेदवार देण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. विशेष म्हणजे अद्याप यासंदर्भात स्वत: राज ठाकरे यांनी कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. अशात मनसे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याच्या वार्तेने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) मनसे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात नव्हता. मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता.
राज ठाकरेंनी असा निर्णय घेतला असेल तर आम्ही कार्यकर्ते तयार आहोत. पक्षमेळाव्यात जाहीर केले होते की, मनसे 200 ते 215 जागा लढविणार आहे, असेही महाजन यांनी सांगितले. मतदारसंघातील आढाव्यासाठी राज ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्यात निरिक्षक नेमले. या निरीक्षकांनी आपला अहवाल दिला आहे. त्यानंतर राज यांनी निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेचा आरक्षणाला विरोध आहे. जातीवर नव्हे तर आर्थिक निकषांवर आरक्षण असावे, अशी मनसेची भूमिका आहे. समाजाच्या काही घटकाचे ते म्हणणं असेल तर हा प्रश्न सामोपचाराने सुटेल. राज ठाकरे पूर्वी म्हणाले होते की, सत्तेत असलेले आणि सत्तेत नसलेले या सगळ्यांना आरक्षण मान्य आहे तर अडले कुठे? असेही महाजन यांनी नमूद केले.
ठाकरेंचे मुस्लिम प्रेम
मराठवाड्यात कासीम रिझवी नावाचा रझाकार होता. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्रातील मुस्लिमांचे कासीम रिझवी आहे. ठाकरेंना आता मुस्लिमांबद्दल खुपच पुळका आला आहे. मुस्लिमांनाही त्यांचे प्रेम आहे, असेही महाजन म्हणाले. काही दिवसांपूर्वी राज यांनी एक ट्विट केले होते. महाराष्ट्रात गेल्या दशकभरात जे जातीपातीचे विष पसरलेय ते समूळ नष्ट होऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी केली होती. राज ठाकरे यांची ही टिप्पणी शरद पवारांसाठी (Shrad Pawar) होती असे सांगण्यात येत आहे. अगदी लहान मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचा संदर्भ येतो. यामुळे भीती वाटते असेही राज म्हणाले होते.
मुघलांच्या आक्रमणात सुद्धा मराठी सत्व टिकवून होते. ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली. तेव्हाही मराठी डगमगला नाही. मात्र आता हाच मराठी माणूस हाच समाज कसा विस्कटत चालला आहे, असेही ठाकरे म्हणाले होते. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना त्यांनी हे ट्विट केले होते. त्यामुळे राज ठाकरे राज्यातील जातीपातीच्या राजकारणामुळे अस्वस्थ असल्याचे दिसले होते. अशात महाजन यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याबद्दल सूतोवाच केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे समीकरण तयार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.