Eknath Shinde Group : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रिअलिटी-शो बिग बॉस विरुद्ध आता वातावरण तापले आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीजनचे प्रसारण सध्या सुरू आहे. या कार्यक्रमात अश्लिलता दाखविली जात आहे. या शोचे प्रसारण तातडीने बंद करावे, अशी मागणी शिवसेना सचिव आणि प्रवक्ता आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्रही दिले आहे. आमदार डॉ. कायंदे यांनी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर वर दाखविल्या जाणाऱ्या बिग बॉस सिजन थ्री मधील 18 जुलै 2024 रोजी प्रसारित एका एपीसोडमध्ये कलाकार कॅमेऱ्यासमोर अतिशय बीभत्स आणि किळसवाणे कृत्य करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पोलिस आयुक्तांना त्यांनी याबाबत माहिती दिली. याच शो दरम्यान अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांनी कलाकारांना कौटुंबिक नात्याचा सर्व सीमा पार करत सामाजिक मूल्ये पायदळी तुडविल्याची टीकाही डॉ. कायंदे यांनी केली. बिग बॉस या शोने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
मुलांवर परिणाम
लहान मुलेही बिग बॉस हा शो पाहतात. अरमान मलिक जे बोलत आहेत, त्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतो. त्यामुळे शो तातडीने बंद करावा. शोचे निर्माते आणि प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीच्या सीईओंवर सायबर क्राइमअंतर्गत गुन्हा दाखल करावा. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. कायंदे यांनी या एपीसोडवर आक्षेप घेतला त्याचे व्हिडीओ विविध सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याची तपासणी करावी. यांसदर्भात कायद्यातील सर्व कमलांचा वापर करावा, असेही त्या म्हणाल्या. यासंदर्भात कारवाई न झाल्यास शिवसेना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
छोट्या पडद्यावरील अनेक शोमध्ये अश्लील कृत्य करण्यात येत आहेत. असे कृत्य करणाऱ्या व करून घेणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई गरजेची आहे. त्यामुळे शोचे प्रसारण करणाऱ्या कंपनीच्या सीईओविरुद्ध सायबरसह भारत न्याय संहितेची विविध कलमे लावण्यात यावे, अशी लेखी मागणी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ओटीअी प्लॅटफॉर्मवर सध्या धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मलाही सेन्सॉरच्या कक्षेत आणण्याची मागणी करण्याबाबत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्र्यांची भेट घेऊन करणार असल्याचे डॉ. कायंदे यांनी सांगितले.