Chandrapur Battlefield : महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएम ‘पतंग’ उडविण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यानुसार चंद्रपुरातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघात एआयएमआयएम उमेदवार उतरविणार आहे. चंद्रपुरात पक्षाचे शहराध्यक्ष अजहर शेख यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आला. असदुद्दीन ओवेसी, एआयएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याची सूचना केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील महत्वाच्या नेत्यांची बैठकही त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी उमेदवारांच्या नावांची चाचपणी करण्याची सूचना सर्व जिल्हाध्यक्षांना केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावाही त्यांनी घेतला. विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांच्या नावावर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यांना निवडणुकीसाइी तयारी करण्यास परवानगी देण्यात आली. याच बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील एआयएमआयएम टीमने जिल्ह्यातील सहा पैकी तीन विधानसभा मतदारसंघ लढवण्याची इच्छा व्यक्त केली.
चंद्रपुरातही बैठक
निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची बैठक शनिवारी (ता. 20) चंद्रपुरात झाली. या बैठकीज आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. चंद्रपुरातील तीन विधानसभा मतदारसंघात पक्षाने आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्याचे यावेळी सांगण्यात आले. या तीन विधानसभा मतदारसंघाची लवकरच एआयएमआयएम घोषणा करणार आहे. यासोबतच उमेदवारांच्या नावांची घोषणाही करणार आहे. योग्य वेळी यासंदर्भातील घोषणा करण्यात येईल, असे बैठकीत जाहीर करण्यात आले.
चंद्रपूर एआयएमआयएमचे शहराध्यक्ष अजहर शेख, घुग्गुसचे शहराध्यक्ष सानू सिद्दीकी, गडचांदूरचे तालुकाध्यक्ष हाफिज भाई, बल्लारपूरचे शहराध्यक्ष मुकद्दर भाई, जिल्हाध्यक्ष अमन अहमद, जिल्हा सरचिटणीस झाकीर भाई, एआयएमआयएम युवक आघाडीचे शहराध्यक्ष हनीफ रझा बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात एआयएमआयएम उतरल्यामुळे अल्पसंख्यांक मतदारांना नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत राज्यातील मुस्लिम मतदार काँग्रेसला (Congress) मतदान करीत होता. परंतु काँग्रेसने मुस्लिम समाजासाठी काहीच केले नाही, असा आरोप होत होता. त्यामुळे एआयएमआयएमने या मतदारांना आता पर्याय उपबल्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. एआयएमआयएमच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलणार आहे. याचा काँग्रेसला प फटका बसतो की भाजपला फायदा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
2014 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी मुंबईमधील भायखळा व तेव्हाच्या औरंगाबादमधील मध्य विधानसभा मतदारसंघ या दोन जागांवर विजय मिळविला होता. 2018 मध्ये एमआयएमने महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती केली होती. त्यापैकी 48 जागांपैकी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमचा विजय झाला. 2019 मध्ये मात्र वंचित आणि एआयएमआयएमची युती होऊ शकली नाही. त्यामुळे एआयएमआयएम स्वतंत्रपणे निवडणूक लढली. चार जागांवर आपले उमेदवार उभे केले. यातील मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती इस्माइल आणि धुळे शहरातून शाह फारूक अन्वर विजयी झालेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत एमआयएमने एकूण 7 लाख 37 हजार 888 म्हणजे सव्वा टक्क्यांवर मतदान मिळविले आहे.