Shiv Sena : गुरूपौर्णिमेच्या दिवशी धर्मवीर-2 या मराठी चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट लवकरच पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात आपली भूमिका कोणती, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तुमचे पात्र ‘धर्मवीर 3’ मध्ये आहे. यानंतर फडणवीस यांनी स्वतःचा चित्रपट काढायचा असल्याची इच्छा बोलून दाखवली. पण आपण चित्रपट काढला तर अनेकांचे खरे मुखवटे उघड होतील असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुंबईमध्ये शनिवारी (ता. 21) बहुप्रतीक्षित धर्मवीर-2 चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित होते. कार्यक्रमात फडणवीस आणि शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून म्हणाले की, आताच्या घडामोडींपर्यंत चित्रपट आला असेल तर माझे पात्र त्यात आहे का? यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तुमचे पात्र ‘धर्मवीर 3’ मध्ये आहे.
दुसरा भाग लवकरच
धर्मवीर चित्रपट ज्यावेळी प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपटाचा दुसरा भाग येईल असे कोणाला वाटले नव्हते. चित्रपटाबरोबरच शिंदे यांच्या जीवनाचे भाग दोन येणार असल्याचीही कल्पना नव्हती. दिघे यांच्या शिकवणुकीप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे. शिंदे यांचे कतृत्व पाहून आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आशीर्वादच देत असतील. या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती, असे फडण्वीस यावेळी म्हणाले.
बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी झाली म्हणून एकनाथ शिंदे सरकार सोडून बाहेर आले. पण दुर्दैवाने त्यांना गद्दार म्हणून हिणवले गेले. लोकांनी त्यांना टोमणे मारले. पण आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांची खरी ताकद एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे कितीही हिणवले गेले तरी शिंदे हे हरले नाही. घाबरले नाहीत. शिंदे यांचे नेतृत्व अख्ख्या महाराष्ट्राने स्वीकारले आहे. खरे सोने आणि पितळ यातील फरक महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
भाऊंनाही काढायचाय चित्रपट
फडणवीस कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, मला देखील एक चित्रपट काढायचा आहे. मी जेव्हा चित्रपट काढेन, तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील. अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. असा चित्रपट काढण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करीत आहे. ग्य वेळ आली की, निश्चितच मी चित्रपट काढणार आहे. फडणवीस यांनी हे बोलताच कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, खासदार श्रीकांत शिंदे, सलमान खान, जितेंद्र, महेश कोठारे, अशोक सराफ, गोविंदा यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.