महाराष्ट्र

Nagpur Flood : सर आली धावून, पूर्ण कचरा आला वाहून

Dharmapal Meshram : वाठोडा डम्पिंग परिसरात जनजीवन विस्कळीत 

Wathoda Dumping Yard : पावसाळापूर्व तयारीच्या दृष्टीने करण्यात आलेल्या नालेसफाईत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. ही कामे नागपूर महानगरपालिका प्रशासनाची खानापूर्ती ठरल्याचे सिद्ध झाले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील वाठोडा कचरा डम्पिंग यार्ड परिसरात महानगरपालिका प्रशासनाच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. येथील संपूर्ण वस्त्या जलमय झाल्या आहेत. डम्पिंग यार्डमधील कचरा पावासाच्या पाण्यामुळे वाहात आला आहे. कचरायुक्त पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरले आहे. त्यामुळे वाठोडा भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

बोगस पद्धतीने नालेसफाई करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार मनपाद्वारे करण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे. नालेसफाईच्या भ्रष्टाचारात खुद्द घनकचरा व्यवस्थापन व संबंधित उपायुक्तांचेही हात रंगले आहेत का ? अशी शंका व्यक्त करीत अॅड. मेश्राम यांनी जलमय वस्त्यांतील बाधिताना तत्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. शनिवारी नागपुरात सात तासात सुमारे सव्वा दोनशे मिलिमीटर पाऊस झाला. 20 जुलै रोजी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक वस्त्या जलमय झाल्या.

सर आली धावून कचरा आला वाहून

दुपारी बाराच्या सुमारास पावसाने उसंत घेतली. शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील पडोळे नगर, पँथर नगर, संघर्ष नगर, चांदमारी नगर, सुरज नगर, पवनशक्ती नगर, धरतीमा नगर, मानवशक्ती नगर, श्रावण नगर, वैष्णोदेवी नगर, राज नगर, अंतूजी नगर, अब्बूमिया नगर, तुलशी नगर, न्यू सूरज नगर या वस्त्या पूर्णतः जलमय झाल्या आहेत. या वस्त्यांमध्ये कमरेपर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. शेजारीच भांडेवाडी डम्पिंग यार्ड आहे. त्यामुळे येथुन वाहणाऱ्या नाल्यात कचरा अडकू नये, याची काळजी मनपा प्रशासनाने घेणे आवश्यक होते. मात्र तसे झालेले नाही.

प्रत्यक्ष नालेसफाई करताना कचराच काढण्यात आला नाही. केवळ दिखावू काम करण्यात आले. शंभर टक्के नालेसफाई केल्याचा बाता प्रशासनाने मारल्या. नागपूर महानगरपालिका प्रशासनाच्या या बेजबाबदार कामाच्या पापाची फळे स्थानिकांना भोगावी लागत आहेत. महानगरपालिकेद्वारे नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे दाखविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात काम झाल्याचा बनाव झाला आहे. नागरिकांचे पैसे लाटण्याचेच काम झाल्याचे यावरून दिसून येते. नालेसफाईची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व संबंधित उपायुक्तांकडे आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारात उपायुक्तांचेही हात रंगले आहे का? याची महापालिका आयुक्तांनी चौकशी करणे आवश्यक आहे, अशी मागणी देखील धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!