Traffic Jam : नागपूरला मान्सूनच्या पावसाने झोडपून काढले. शनिवारी (ता. 20) पहाटेपासून नागपुरात मुसळधार पाऊस झाला. अनेक भागातील रस्ते बंद झालेत. अशात प्रशासनाने शाळांना सुटी जाहीर करण्यासाठी विलंब लावल्याने अनेक ठिकाणी स्कूल बस आणि व्हॅनमध्ये विद्यार्थी अडकून पडले. भारतीय मौसम विभागाने (IMD) विदर्भाला ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यामुळे मुसळधार पाऊस होऊ शकतो, हे प्रशासनाला आधीच ठाऊक होते. शनिवारी पहाटेपासून पाऊस सुरू झाला. मात्र जिल्हा प्रशासनाने सकाळ उजाडेपर्यंत शाळांना सुटी जाहीर केली नाही. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी सकाळी सहा वाजताच शाळांकडे रवाना झालेत.
सकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील अनेक रस्ते खुले होते. मात्र पावसाचा जोर वाढल्याने व पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक भागातील रस्ते बंद झाले. अख्ख्या नागपूरमध्ये हाहा:कार उडाला. त्यानंतर प्रशासनाने शाळांना सुटी जाहीर केली. मात्र तोपर्यंत बऱ्यापैकी विद्यार्थी अडकले होते. शहरातील अनेक नाले ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने त्यांच्या दुतर्फा स्कूल बसेस व व्हॅन अडकून पडल्या होत्या. नागरिकांनी या वाहनांना वाट मोकळी करून दिली. मात्र पावसाचा जोर इतका होता, की मदत करताना अनेक अडचणी येत होत्या.
दुर्लक्ष भोवणारे
पावसानंतर नागपुरात काय परिस्थिती निर्माण होते, याची जाणीव प्रशासनाला आहे. कोणत्या रस्त्यांवर पाणी साचते हे आता स्मार्ट सिटी नियंत्रण कक्षातून चटकन दिसते. परंतु त्यानंतरही प्रशासनाने पावसाचा जोर वाढण्यापर्यंत विलंब का केला? ही बाब अनाकलनीय आहे. यावरून आधीच्या अनुभवातून नागपूर प्रशासन शहाणे झालेच नाही, असेच म्हणावे लागणार आहे. नागपुरात मोठी नदी नाही. आसपास मुंबईप्रमाणे समुद्रही नाही. तरीही दरवर्षी पावसाळ्यात नागपूर बुडते. यातून नागरिकांची वारंवार गैरसोय होते. मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याचे दिसत आहे.
नागपूर बुडाल्यावर राजकीय मंडळी आणि प्रशासनाला काही दिवस खडबडून जाग येते. त्यानंतर पत्रकार परिषद होतात. नेते मोठ्या घोषणा करतात. अधिकारी वेगाने कामाला लागल्यासारखे दाखवतात. परंतु पुन्हा पुढच्या पावसाळ्यात गत तशीच असते. शनिवारी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. अनेक भागांमध्ये नाल्यांचा प्रवाह बंद करून आलीशान अपार्टमेंट उभारण्यात आले आहेत. मात्र या नाल्यांचा प्रवाह आजही आहे, तसाच आहे. त्यामुळे हे पाणी त्याच दिशेने वाहणार यात दुमतच नाही. परंतु पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतेही उपाय न झाल्याने शनिवारी नागपूरकरांची दाणादाण उडाली यात शंकाच नाही.