महाराजांची ही वाघनखं खरी आहेत. तलवारी अनेक असतात, तशी वाघनखंही अनेक होती. त्यांपैकीच महाराजांची ही वाघनखं आहेत. याच वाघनखांनी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. त्यामुळे याकडे केवळ वाघनखं म्हणून बघू नका तर ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, अश्या भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केल्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५०वे वर्ष राज्य सरकारने दिमाखात साजरे केले, त्याबद्दल राजघराण्याच्यावतीने, साताऱ्याच्या वतीने सरकारचे अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.
शुक्रवारी (ता. 19) सातारा येथे शस्त्रांच्या कवायतीसह ‛शिवशस्त्रशौर्यगाथा’ हा दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत वाघनखं दर्शनासाठी खुली करण्यात आली. यावेळी शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, शंभुराज देसाई यांचीही उपस्थिती होती.
मराठ्यांच्या राजधानीत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत करतो. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. महाराजांनी त्या काळात लोकशाहीचा ढाचा रचला. युगपुरूष राजा होऊन गेला. त्यांनी त्यावेळी एक विचार मांडला. लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे. तेव्हाच लोकशाहीची निर्मिती झाली. त्यांनी जो विचार दिला, त्या आधारावर भारत जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला देश झाला. हा विचार महाराजांनी तेव्हा दिला नसता, तर हे झाले नसते. जातीभेद न करता लोकांना एकत्र करण्याचे काम महाराजांनी केलं, असं उदयनराजे म्हणाले.
शिवेंद्रराजेंनी मागण्यांमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला. मी विनंती करतो की, महाराजांचं एक स्मारक दिल्लीत व्हावं. जसं बुद्ध सर्किट आहे. त्याच प्रकारे हे सर्किट स्थापन करावं. त्यातून लोकांपर्यंत महाराजांचा इतिहास पोहोचवू शकतो. वादविदा अनेक होत असतात. हे टाळण्याकरीता सरकारने एक समिती नेमावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली.
विरोधकांना आवाहन
शासनाच्या वतीने महारांचं चरित्र्य प्रकाशित करावं. कारण देवांच्या सणांना तारखांचे वाद होत नाहीत, पण महाराजांचा विषय निघतो तेव्हा वाद विवाद का निर्माण होतात? कोणताही पक्ष असो महाराजांचे नाव घेऊन कामाला सुरूवात करतात. पण त्यांच्याच वस्तूबाबत वादविवाद केले जातात. या देशाला केवळ छत्रपती महाराजांचाच विचार अखंड ठेवू शकतो. हा नको तो नको असं करून चालणार नाही, असे उदयनराजे भोसले म्हणाले.