अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघनखांचे बुधवारी (दि.१७) मुंबईत स्वागत झाले. त्यानंतर आता स्वराज्याची राजधानी सातारा येथे वाघनखे दाखल होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं सातारा येथे शुक्रवारी (दि. 19 जुलै) छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवभक्तांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत.
लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली गेली आहेत. साताऱ्यातील संग्रहालयात पुढील दहा महिने ही वाघनखे इतिहासप्रेमींना बघता येणार आहेत. ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघनखे भारतात कधी येणार याची उत्कंठा आता संपली आहे.
साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे दाखल झाली आहेत. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून कोणालाही प्रवेश दिला जात नाही. उद्या 19 जुलै रोजी याचं दिमाखात मोठं स्वागत केलं जाणार आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनख्यांसाठी विशेष अशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे.
वाघनखांचे जंगी स्वागत जिल्हा प्रशासनासह साताऱ्यातील शिवभक्त करणार आहेत. या स्वागतासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुनगंटीवार यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आल्यामुळे विरोधक जखमी झाले आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. आणि आता इतिहासतज्ज्ञ असल्यासारखे आरोप करीत आहेत, असे जोरदार प्रत्युत्तर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.
त्यांना सवय झाली आहे
विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वाघनखांच्या संदर्भात केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘विरोधी पक्षाचे लोक म्हणजे इतिहासकार किंवा इतिहासतज्ज्ञ नाहीत. टीका करण्याची ही त्यांची पद्धत आहे. आता त्यांना त्याची सवय झालेली आहे. प्रभू रामाचा विषय होता तेव्हा काल्पनिक कथा आहे असं म्हणायचे, राम सेतूचा विषय होता तेव्हाही सुप्रीम कोर्टात गेले.’