Political Fielding : गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा आमदाराच्या खुर्चीवर कोण बसणार, यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. या मतदारसंघासाठी भाजपमध्ये सर्वाधिक स्पर्धा आहे. या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारीही आता त्यापैकी काहींनी केली आहे. बॅनरबाजी आदीच्या माध्यमातून त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे. भाजपमधून सद्य:स्थितीत सहा जणांच्या नावांवर जोरात चर्चा आहे.
दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचे सुपुत्र अनुप किंवा कृष्णा यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यावी, अशी काही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भाजपचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी यापूर्वीच उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणूक (Lok Sabha) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अकोला दौऱ्यावर आले होते. त्यावेळी जोशी यांनी उमेदवारी मिळण्याबाबतचे पत्र पक्षातील नेत्यांना दिले होते. जोशी यांनी उमेदवारी मिळावी अशी इच्छा केवळ व्यक्त केली आहे. उमेदवारी न मिळाल्यास त्याचा कामावर कोणताही परिणाम होणार नाही, हे त्यांनी त्याच पत्रात नमूदही केले आहे.
दमदार नावे चर्चेत
अकोला पश्चिमसाठी इच्छुकांमध्ये दुसरे नाव आहे डॉ. अशोक ओळंबे यांचे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते या मतदारसंघात निवडणुकीची तयारी करीत आहे. त्यादृष्टीने त्यांचा जनसंपर्कही सुरू आहे. डॉ. ओळंबे हे धोत्रे विरोधी गटातील आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला विरोधही तितकाच आहे. डॉ. ओळंबे यांच्यासोबत भाजपमधील बोटावर मोजण्याइतकेच लोक आहेत. याशिवाय माजी महापौर विजय अग्रवाल यांचेही नाव या मतदारसंघासाठी चर्चेत आहे. अग्रवाल हे निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. मात्र अद्याप त्यांनी स्वत: यासंदर्भात कोणतीही अधिकृत मागणी पक्षाकडे केलेली नाही.
भाजपच्या आणखी एका माजी महापौराचे नावही इच्छुकांसाठी चर्चेत आहे. अश्विनी हातवळणे यांच्याकडून अकोला पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी दावा केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. हातवळणे यांच्याव्यतिरिक्त सिंधी समाजात प्राबल्य असणारे हरीश अलीमचंदानी यांच्या नावाचीही चर्चा आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात व्यापारी वर्गाची संख्या मोठी आहे. सिंधी समाजाच्या मतांचा टक्काही बऱ्यापैकी आहे. अशात त्यांना उमेदवारी मिळाल्यास आमदार गोवर्धन शर्मा यांना अलीमचंदानी साजेसा पर्याय ठरू शकतात असे बोलले जाते.
आमदार गोवर्धन शर्मा आपल्या राजकीय कारकीर्दीत कधीच वादात सापडले नाही. त्यांनी अधिकाराचा दुरूपयोगही केला नाही. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. निरुपद्रवी आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. हरीश अलीमचंदानी यांचे व्यक्तीमत्व जवळपास शर्मा यांच्यासारखेच आहे. शर्मा हे देखील व्यापारी होते. अलीमचंदानी हे स्वत: व्यापारी आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी त्यांना चांगल्याच ठाऊक आहेत. अशात मतदार त्यांना पसंती देऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.
शिंदे सेनेचे काय?
अकोला पश्चिम मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे (Shiv Sena Eknath Shinde) गोपीकिशन बाजोरिया यांना उमेदवारी मिळावी, असा काहींचा प्रयत्न आहे. अकोला भाजपमधील एक नेता यासाठी प्रयत्नशील आहे. ही जागा शिंदे सेनेला सुटल्यास एका दगडात अनेक पक्षी या नेत्याला टिपता येणार आहेत. परंतु या नेत्याच्या सांगण्याला भाजपचे पक्षश्रेष्ठी कितपत मनावर घेतात यावर सारेकाही अवलंबून आहे. महायुतीमधील जागांचे वाटप आणि त्यानंतर उमेदवाराचे निश्चित होणारे नाव यानंतरच अकोला पश्चिमचा नवा आमदार कोण होऊ शकतो, हे स्पष्ट होऊ शकणार आहे.