Police Complaint : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. वाशिम पोलिसांमध्ये त्यांनी यासंदर्भात रितसर फिर्याद दिली आहे. पुणे येथे कार्यरत असताना सुहास दिवसे यांनी छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांनी हे प्रकरण सध्या चौकशीत ठेवले आहे. तक्रार करणारा आणि प्रतिवादी दोन्हीही आयएएस अधिकारी असल्याने वाशिम पोलिस ‘नो रिस्क’ भूमिकेत आहेत. वाशिमच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चमूसोबत सोमवारी रात्री उशिरा तब्बल तीन तास पूजा खेडकर यांनी बंद द्वार चर्चा केली होती. तक्रार दाखल करण्याच्या हेतूनेच ही चर्चा होती.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर पूजा कार्यरत होत्या. कार्यालयात कामासाठी त्यांनी स्वतंत्र कक्ष व कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या कक्षाचा ताबा घेतला होता. यावरून वादंग झाले. त्यानंतर पूजा यांनी खासगी ऑडी कारवर अंबर दिवा लावला. त्यावर महाराष्ट्र शासन असे लिहिले. यासाठी त्यांनी कोणतीही लिखित शासकीय परवानगी घेतली नव्हती. पुण्यातील घटनेनंतर पूजा यांची बदली वाशिम येथे करण्यात आली. त्यानंतर एक एक करीत अनेक वादग्रस्त मुद्दे पुढे आलेत.
चक्रव्यूहात अडकल्या खेडकर
पूजा खेडकर आता जणू संकटाच्या चक्रव्यूहात अडकल्या आहेत. त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घराचे अतिक्रमण पाडण्यात आले आहे. ऑडी कार पोलिसांनी जप्त केली आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत दिव्यांग आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बनावट असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. अशातच त्यांच्या विरोधात आता पंतप्रधान कार्यालयाने (PMO) चौकशीही सुरू केली आहे. तब्बल 11 वेळा परीक्षा दिल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्याविरुद्ध आहे. एकापाठोपाठ घटनाक्रम सुरू असताना खेडकर यांनी आपल्यास ‘सिनीअर’ अधिकाऱ्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे.
Nana Patole : विशाळगडाच्या नावाखाली दंगली घडविण्याचे षडयंत्र
पूजा खेडकर यांनी तक्रारीत काय नमूद केले, याबद्दल पोलिसांनी खुलासेवार सांगण्यास नकार दिला. मात्र ही तक्रार पूजा खेडकर यांनी वाशिम जिल्ह्यातून कार्यमुक्त होण्याआधी दिली आहे. खेडकर यांनी तक्रार दिल्यानंतर काही तासातच त्यांच्या वाशिम जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी कालावधीला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर त्यांना 23 जुलैपूर्वी मसुरी येथे हजर होण्याचे आदेश देण्यात आलेत.
राज्य सरकारच्यावतीने अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी हे आदेश काढले. प्रशिक्षणार्थी कालावधीला स्थगिती मिळाल्याने वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी पूजा खेडकर यांना तत्काळ कार्यमुक्त केले.