Congress On BJP : विशाळगड हिंसाचाराचे प्रकरण हे महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावात एकाच धर्माच्या लोकांवर हल्ले करण्यात आले. त्यांच्या मालमत्तांचे नुकसान करण्यात आले. झुंडशाहीचा हा प्रकार आहे. दंगेखोरांच्या तत्काळ मुसक्या आवळा. गेल्या काही दिवसांपासून राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही नेते प्रक्षोभक वक्तव्य करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात हिंदू मुस्लीम तेढ निर्माण होत आहे. असे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणिवपूर्वक होत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. विशाळगडावरील अतिक्रमणे काढले पाहिजे. याबाबत कुणाच्याही मनात दुमत नाही. अतिक्रमणाचे हे प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयातील सुनावणीवेळी सरकारी वकील उपस्थित नसतात. सरकार पक्षाकडूनच वेळकाढूपणा केला जात आहे. असे असताना अचानक अतिक्रमणाचा मुद्दा पुढे आणला गेला, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले.
फडणवीसांवर आक्षेप
विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गडापासून चार किलोमीटर दूर असलेल्या गजापूर गावात एका धर्माच्या लोकांवर हल्ला करण्यात आला. त्यांना मारहाण करण्यात आली. विशाळगडावरील अतिक्रमण व गजापूर गावातील दंगल हे दोन्ही वेगळे विषय आहेत. अशात गृहमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विधान दंगेखोरांवर कारवाई करण्यासंदर्भातील नाही. विशिष्ट धर्माला भिती घालणारे आहे. धार्मिक रंग देणारे आहे. दंगेखोरांना पाठीशी घालणारे आहे. त्यामुळे विधानाचाही निषेध करीत असल्याचेही पटोले म्हणाले.
योग्य खबरदारी नाही
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात हाक दिली. त्यानंतर हजारो तरुण विशाळगडाकडे निघाले. याची कल्पना प्रशासन आणि पोलिसांनी होती. त्यामुळे त्यांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे होते. ही खबरदारी त्यांनी घेतली नाही. गजापूर गावातील ज्या लोकांचे नुकसान झाले आहे, त्यांना सरकारने मदत करावी. दहशतीत असलेल्या गावकऱ्यांना सरकारने सुरक्षेचा विश्वास द्यावा. सरकारने यासंदर्भात सखोल चौकशी करावी. दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असेही नाना पटोले म्हणाले.