IAS officer Pooja Khedkar : आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची काही दिवसांचीच कारकीर्द वादग्रस्त ठरली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन प्रकरण समोर आले. त्यांची वाशिमला बदली करण्यात आली. येथे येऊन काही दिवस होत नाहीत तर आता उत्तराखंड येथील मसुरी प्रशिक्षण केंद्रात रवानगी करण्यात आली. या सगळ्या घडामोडी होत असताना पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनाही एक प्रकरण भोवले आहे. अश्यातच त्यांच्या जवळ असलेली संपत्ती सुध्दा चर्चेचा विषय ठरत आहे.
ACB ची चौकशी भोवणार
पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबाशी संबंधित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार आहे. खेडकर कुटुंबीयांच्या नावे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती एसीबीला मिळाली आहे. आता यासंदर्भात एजन्सी त्यांची चौकशी करणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकरचे आई-वडील फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पूजा खेडकरच्या वडिलांनी जमा केलेल्या बेहिशेबी संपत्तीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. दिलीप खेडकर यांनी अवैध मार्गाने कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय एसीबीला आहे.
मालामाल है मामला..
पूजा खेडकरच्या पालकांकडे 110 एकर शेतजमीन आहे. याशिवाय सहा दुकाने, सात फ्लॅट (हिरानंदानीमधील एक), 900 ग्रॅम सोने, हिरे, 17 लाख रुपये किमतीचे सोन्याचे घड्याळ, चार कार आहेत. यासोबतच त्यांची दोन खाजगी कंपन्या आणि एका ऑटोमोबाईल फर्ममध्ये भागीदारी आहे. IAS पूजा खेडकर यांची स्वतः 17 कोटींची संपत्ती आहे.
पूजाकडे किती संपत्ती?
पूजा खेडकर जवळपास 22 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालक आहेत. 2015 मध्ये पुणे येथे 2 भूखंड खरेदी केले. यामध्ये त्यांनी एक प्लॉट 42 लाख 25 हजार रुपयांना तर दुसरा प्लॉट 43 लाख 50 हजार रुपयांना खरेदी केला. सध्या दोन्ही भूखंडांचे बाजारमूल्य सहा ते आठ कोटींच्या दरम्यान आहे. 2018 मध्ये पुण्यातील धानेरी परिसरात 4.74 हेक्टर जमीन 20 लाख 79 हजार रुपयांना खरेदी केली होती. त्याची सध्याची किंमत 3 ते 4 कोटी रुपये आहे. 2020 मध्ये 724 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट 44 लाख 90 हजार रुपयांना खरेदी केला होता, ज्याची किंमत सध्या 75 लाख रुपये आहे. तसेच अहमदनगरमध्येही तीन मालमत्ता आहेत.
वडिलांची संपत्ती 40 कोटी
पूजाच्या वडिलांनी नुकतीच लोकसभा निवडणूक दक्षिण अहमदनगरमधून लढवली. त्यात निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती तब्बल 40 कोटींची दाखविण्यात आली आहे. तर शेतीतून 43 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळत असल्याचे जाहीर केले आहे.