आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची काही दिवसांचीच कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन प्रकरण भोवले. त्यांची वाशिमला बदली करण्यात आली. येथे येऊन काही दिवस होत नाहीत तर आता उत्तराखंड येथील मसुरी प्रशिक्षण केंद्रात रवानगी करण्यात आली. या सगळ्या घडामोडी होत असताना पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनाही एक प्रकरण भोवले आहे. त्यात त्यांचा पिस्तूल परवाना रद्द होण्याची शक्यता आहे.
मनोरमा यांनी मुळशी तालुक्यात जमिनीचा ताबा घेताना शेतकऱ्यावर पिस्तूल रोखली होती. तसेच मारहाणही केली होती. यासाठी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोेलिसांच्या पौड पोलिस ठाण्याने ही कारवाई केली. त्यानंतर मनोरमा यांचा पिस्तुलाचा परवाना रद्द करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नोटीस बजावली आहे. यासोबतच खेडकर यांची अलिशान कार पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बंगल्याच्या चिकटवली नोटीस
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मनोरमा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. ‘तुमचे कृत्य बेजबाबदारपणाचे आहे. तुमच्या कृत्यामुळे कुटुंबाला व समाजाला धोका निर्माण होऊ शकतो. तुम्ही शस्त्र परवान्यात दिलेल्या अटी आणि शर्थींचा भंग केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना रद्द करण्यात का येऊ नये?’ असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
कुटुंबियांचे अनेक कारनामे समोर
पूजा खेडकर यांच्यासह आता त्यांच्या कुटुंबियांचेही कारनामे रोज जगापुढे येऊ लागले आहेत. चोर म्हणून पकडलेल्या नातेवाईकाला सोडविण्यासाठी खेडकर यांनी थेट नवी मुंबईच्या बड्या पोलीस अधिकाऱ्याला आयएएस पदाचा धाक दाखविला होता. तसेच जमीन हडपण्याच्या प्रकरणात शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत दमदाटी करतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. सुरुवातीला शेतकऱ्यांची तक्रार स्वीकारली नव्हती, मात्र आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.