राजकीय पुढारी एका दिवसांत तयार होत नाहीत. सर्वसामान्यांप्रमाणे त्यांच्याही आयुष्यात बरे-वाईट प्रसंग असतात. सदाभाऊ खोत यांना देखील भूतकाळातील अश्याच एका प्रसंगाची आठवण करून दिली जात असते. अर्थात सोशल मीडियावरूनच ही ‘मेमरी’ त्यांच्या मानगुटीवर भूत होऊन बसली आहे. अशीच एक पोस्ट पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे. त्यात ‘सदाभाऊ, उधारीचे काय झाले?’ असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
आमदार सदाभाऊ खोत यांना रस्त्यात अडवून एका हॉटेल मालकाने जुनी उधारी मागितल्याचा व्हिडीओ काही वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता. 2014 सालापासून उधारी दिली नसल्याने संतप्त हॉटेल मालक सदाभाऊंना नको नको ते बोलला होता. यानंतर सदाभाऊंनी पत्रकार परिषद घेत त्या हॉटेल मालकाला उत्तर दिले होते. विरोधकांनी देखील याचा चांगलाच फायदा घेतला होता. दरम्यान आता विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर पुन्हा त्या विषयाची पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागली आहे.
सदाभाऊ खोत दोन वर्षांपूर्वी एका व्हिडीओमुळे चांगलेच अडचणीत आले होते. सदाभाऊ सांगोला दौऱ्यावर असताना एका हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला. त्याने 2014 मधील उधारी कधी चुकवणार असे सदाभाऊंना विचारले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सदाभाऊ चपापले. मात्र, त्यांनी ‘तुझं काय आहे ते नंतर बघू’, असे म्हणत वेळ मारून नेली. पण या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
संबंधित हॉटेल मालक राष्ट्वादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीला मला रोखता येत नाही त्यामुळे बदनाम करण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा आरोप सदाभाऊंनी केला होता. हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी एक रजिस्टर दाखवत सदाभाऊ खोत यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जेवणाचं बील दाखवलंय. बिलाचे पैसे मिळेपर्यंत उधारीची आठवण करून देणार, असे त्याने सांगितले होते.
उधारीचे भूत
अलीकडेच विधान परिषदेच्या निवडणुकीत सदाभाऊ विजयी झाले. पश्चिम महाराष्ट्रातील विरोधकांवर आक्रमकपणे बोलणारा नेता म्हणून भाजप त्यांच्याकडे बघतो. त्यादृष्टीने भाजपने त्यांना संधी दिल्याचे बोलले जाते. सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार झाला आहे. असे असले तरी ‘त्या’ हॉटेलच्या बिलाचं भूत मात्र त्यांचा पिछा सोडताना दिसत नाही.
बोट लावीन तिथे गुदगुल्या!
फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून आमदार खोत यांचा एका कार्यकर्त्यासोबतचा फोटो व्हायरल झाला. त्यावर ‘सदाभाऊ आता तरी तुम्ही हॉटेलची उधारी भागवाल ही अपेक्षा आहे’ असा मजूर या फोटोसह पोस्ट करण्यात आला आहे. ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ या फेसबुकवरील अकाउंटवरून ही पोस्ट करण्यात आली आहे.
Umesh Patil : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी विरोधकांकडे कोणता मार्ग?
14 दिवस जेवण; बील 66 हजार 445 रुपये!
हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाभाऊ खोत 2014 साली माढा लोकसभा मतदारसंघातून उभे होते. त्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सांगोला तालुक्यात प्रचारासाठी त्यांचे कार्यकर्ते यायचे. त्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची सुविधा सांगोल्यातील ‘मामा-भाचे’ या हॉटेलमध्ये करण्यात आली. या 14 दिवसांच्या जेवणाचे एकूण बील 66 हजार 445 रुपये झाले होते.
या पदार्थांवर हाणला होता ताव ?
सदाभाऊंच्या कार्यकर्त्यांनी देखील जेवणावर चांगलाच ताव मारला होता. हे बील बघितल्यावर स्पष्ट दिसते. यामध्ये मटन, चिकण, मच्छी ताट, अंडाकरी, पनीर भाजी, दालतडका, काजुकरी, शेंगाभाजी, पनीर टिक्का, शेंगाभाजी या पदार्थांचा समावेश होता. सांगोला तालुक्यातील वाटेगाव, राजपूर, सांगोला शहर, मेडसिंगी, आलेगाव, बुरलेवाडी, सावे, बामणी, मांजरी, घेरडी, मेथवडे, देवळे, धायटी या गावातील कार्यकर्ते जेवल्याचा दावा शिनगारे यांनी केला होता.