Mussoorie : विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा जिल्हा प्रशिक्षाचा कालावधी स्थगित करण्यात आला आहे. या प्रकराच्या कारवाईची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. सरकारने कारवाई करीत कोणत्याही परिस्थितीमध्ये लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी येथे त्यांना 23 जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश ‘डीओपीटी’ने दिले आहेत.
आपल्या विविध कृतीमुळे चर्चेत आलेल्या पूजा खेडकरांच्याबद्दल रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. प्रशिक्षणार्थी असतानाही स्वतःला स्वतंत्र केबिन आणि सरकारी गाडीची मागणी पूजा खेडकरांनी केली होती. त्यानंतर त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांची केबिन बळकावून त्या ठिकाणी स्वतःचे फर्निचर ठेवले. स्वतःच्या खासगी ऑडी कारवर अंबर दिवा लावला. यामुळे पूजा खेडकर चांगल्याच चर्चेत आल्या. त्यांनतर त्यांची पुण्याहून वाशिमला बदली झाली. पण त्यांच्याबाबतीत अनेक गोष्टी समोर आल्या. पूजा खेडकरांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट दिव्यांग सर्टिफिकेट काढल्याचं समोर आलं आहे. त्यांची आणि त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची संपत्ती असतानाही, त्यांनी नॉन क्रिमीलेअरचे सर्टिफिकेट काढल्याचं समोर आलं.
प्रशिक्षणार्थी आयएएस पदावर रुजू होणाऱ्या पूजा दिलीप खेडकर यांनी यूपीएससी 2022 च्या परीक्षेत देशात 821 ऑल इंडिया रँक मिळविला. या रँकवर आयएएस पद मिळणे अवघड असतानाही पुजाने ते प्राप्त करण्यासाठी ओबीसी नॉन क्रीमिलेअर असल्याचे प्रमाणपत्र देऊन, दृष्टिदोष आणि मानसिक आजार असल्याचे सांगतीले होते. त्यावर आयएएस पदावर वर्णी लावली आहे. तर दुसरीकडे पूजा यांच्या वडिलांनी वंचित बहुजन पक्षाकडून नुकतीच लोकसभा निवडणूक दक्षिण अहमदनगरमधून लढवली आहे.
प्रशिक्षण काळातच गैरवर्तन
पूजा खेडेकर यांनी प्रशिक्षण घेत असलेल्या काळातही गैरवर्तन केल्याचे अहवाल संबंधित विभागप्रमुखांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे दिले आहेत. खेडकर या ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमीमध्ये नऊ महिने चार दिवस प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या.
नऊ दिवसांच्या संक्रमण कालावधीनंतर 15 एप्रिल ते 31 मेपर्यंत (सात आठवडे) पुण्यातील यशदा येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. 3 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणाला सुरुवात केली.
पुन्हा जाणार मसुरी
खेडकर या ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमीमध्ये नऊ महिने चार दिवस प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत. त्यांचे गैरवर्तन पाहता त्यांना पुन्हा प्रशिक्षणाची गरज असल्याचे सरकारला लक्षात आल्याने, त्यांना पुन्हा मसुरी येथे 23 जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.