Ladaki Bahin Yojana : भारतीय संविधान बदलणार, या महाविकास आघाडीच्या खोट्या प्रचारानंतरही भाजप केंद्रात पुन्हा सत्तेत आली. आता राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अपप्रचार करण्यात येत आहे. यात अडथळे आणण्याचा आणि बदनाम करण्याचा कुटील डाव महाविकास आघाडीने आखला असल्याचा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. राज्याच्या सर्वच भागांत अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. राज्यभर या योजनेचे अफाट स्वागत झाले. या योजनेने महाविकास आघाडीची झोप उडाली आहे. आता ही योजना बदनाम करण्याच्या कामी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते लागले आहेत. मविआच्या नेत्यांनी ठिकठिकाणी आपल्या लोकांकडून तसे प्रयत्न सुरू केले आहेत.
योजनेचा विरोध
महाविकास आघाडीने विधीमंडळात या योजनेला कडाडून विरोध केला. ही योजना जाहीर केली, तेव्हा मविआच्या नेत्यांच्या अंगाचा तिळपापड झाला होता. तिकडे विरोध करत असतानाच मविआच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांचे फोटो छापून लोकांना पत्रके वाटणे सुरू केले. जणू काही ही योजना आपणच आणली, या अविर्भावात काही कार्यकर्त्यांनी फॉर्म वाटप सुरू केले.
ज्या बहीणी आपले फॉर्म किंवा कागदपत्रे मविआच्या कार्यकर्त्यांकडे देतील, त्यांचे अर्जच चुकीचे भरण्याचा कुटील डाव कॉंग्रेस, उबाठा आणि शरद पवार गटाने आखला आहे. जेणेकरून असंख्य महिला लाभापासून वंचित राहतील आणि नंतर मविआला महायुतीच्या नावे बोंब ठोकता येतील, असे जनविरोधी कारस्थान मविआच्या अनेकांनी सर्वत्र सुरू केले आहे.
पैसे लुबाडण्यात चे प्रकार
काही ठिकाणी अशिक्षित आणि भोळ्या भाबड्या महिलांकडून पैसे घेऊन अर्ज भरून देणारे दलालदेखील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आशीर्वादानेच सक्रिय झाले आहेत. या योजनेत अर्जाची पूर्तता करण्यासाठी अतिशय सुलभ कार्यपद्धती महायुती सरकारने घोषित केलेली आहे. असे असताना महाविकास आघाडीच्या दलालांच्या नादी लागून राज्यातील बहीणींनी आपले नुकसान करून घेऊ नये, अशी सूचना शिवराय कुळकर्णी लाभार्थ्यांना केली आहे.
दलालाला एक रुपयाही न देता महायुती सरकारने सुरू केलेल्या केंद्रांवर किंवा या योजनेच्या मोबाईल ऍप वरच आपला अर्ज भरावा. या योजनेचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी भाजपासह महायुतीचे कार्यकर्ते लोकांना मदत करत आहेत.
महाविकास आघाडीच्या दलालांनी आपला धंदा बंद न केल्यास त्यांना भाजप कार्यकर्ते चोप दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील शिवराय कुळकर्णी यांनी दिला आहे.