IAS Officer Pooja Khedkar : वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आता अकोल्यात येणार असल्याची माहिती आहे. पुणे, वाशिमनंतर पूजा खेडेकर या अकोल्यात येणार आहेत. 15 ते 19 जुलै या कालावधीत अकोला येथील आदिवासी विभागात त्या असतील. प्रकल्प अधिकारी म्हणून त्या आठवडाभर कामकाज प्रशिक्षण घेतील. त्यानंतर 22 जुलैपासून त्या विविध शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतील, असेही सांगण्यात आले आहे.
राज्यात सध्या आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडेकर या चांगल्याच चर्चेत आहेत. पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात असताना त्यांचे अनेक कारनामे समोर आले. त्यांच्या अवास्तव मागण्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यालाही मागे पाडणाऱ्या आहेत. पुणे येथे प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून असताना खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. त्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यां तक्रारीनंतर खेडकर यांची वाशिममध्ये उचलबांगडी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी म्हणून 11 जुलै रोजी रुजू झाल्या. वाशिमला पोहोचल्यावर ‘मला सरकारकडून बोलण्याची परवानगी मिळालेली नाही’, असं विधान करून त्या पुन्हा चर्चेत आल्या.
वाशीममध्ये पहिल्याच दिवशी त्यांनी जिल्हाधिकारी एस. भूवनेश्वरी यांची भेट घेतली. जलसंपदा विभागासह 12 जुलै रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचं प्रशिक्षण घेतले. तर आता 15 ते 19 जुलै त्या अकोल्यात असणार आहेत. आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेणार आहेत. त्याकरिता त्यांना अकोल्यात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर 22 जुलैपासून विविध शासकीय अधिकारी यांच्या भेटी घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचीही माहिती आहे.
वादग्रस्त मागण्या
पूजा खेडकर यांची बदली झाल्यानंतर त्या अधिक चर्चेत आल्या. पूजा खेडकर यांनी प्रोबेशनमध्ये असताना विशेष अधिकारांची मागणी केली. त्यात लाल दिव्याची गाडी, व्हीआयपी नंबर प्लेट, खासगी ऑडी कारवर लावलेला महाराष्ट्र सरकारचा बोर्ड, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी या कारणाने वाद निर्माण झाला.
IAS Puja Khedkar : दिव्यांग प्रमाणपत्र दिले नगरच्या रुग्णालयाने
पूजा खेडकर यांची नियुक्ती, यूपीएससी परीक्षेसाठी सादर केलेले दिव्यांग प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र हे देखील संशयाचे मुद्दे ठरले. याच कारणांनी त्यांची पुण्याहून थेट वाशीमला बदली करण्यात आली. आता पूजा खेडेकर या अकोल्यात असणार आहेत.