BJP Politics : तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील भेटीगाठीचा योग पुन्हा जुळून आला आहे. लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीनंतर शनिवारी (ता. 13) नरेंद्र मोदी यांनी मुंबईला भेट दिली. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मुंबईत आलेत. यावेळी त्यांनी मुंबईला जागतिक स्तरावर थिंक टँक बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर (Mumbai) अद्यापही शिवसेना उद्धव ठाकरे गटाची (Shiv Sena) बऱ्यापैकी पकड आहे. ही पकड सैल करण्याचे प्रयत्न महायुती करीत आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मनाप्रमाणे जागा मिळाल्या नाही. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीला ‘ओव्हरटेक’ केले. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे सरकारने मध्य प्रदेशची ‘कॉपी’ करीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. महिलांसाठी अनेक योजनांचीही घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला. विधिमंडळाच्या पावसाठी अधिवेशनात मुसळधार घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबानगरीत दाखल झालेत.
कोट्यवधींच्या योजना
महाराष्ट्र आणि मुंबईसाठी पंतप्रधानांनी 30 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन केले. काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. रस्ता आणि रेल्वेच्या प्रकल्पांचा (Railway) यात समावेश होता. नवतरुणांनसाठी कौशल्य विकासाची योजनाही यात समाविष्ट होती. यातून महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होईल, असे मोदी म्हणाले. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आपण म्हटले होते की, तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तिप्पट वेगाने काम करणार आहे. त्याची आठवण मोदींनी करून दिली. महाराष्ट्रात उद्योग, वीज, शेती, पाणी सगळेच आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. याच शक्तीच्या आधारावर महाराष्ट्राला ‘पावर हाऊस’ बनविण्याचे लक्ष्य असल्याचे मोदी म्हणाले.
मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी उत्तम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईत कोस्टल रोड आणि अटल सेतू आता पूर्ण झाले आहेत. विरोधकांकडून अनेक अपप्रचार केला जात आहे. चुकीच्या गोष्टी पसरविण्यात आल्या आहेत.
Nana Patole : कर्ज काढून सण करण्याची महायुती सरकारची प्रवृत्ती
अटल सेतू तयार होत असताना या चुकीच्या प्रचाराच्या आधारावर प्रकल्प रखडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आता हाच अटल सेतू लोकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे नरेंद्र मोदी ठामपणे म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून आगामी काळात त्यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढतील असे दिसत आहे. त्यातून आगामी काळात महाराष्ट्राच्या वाट्याला अनेक योजनांची घोषणा येऊ शकते. अर्थातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यास या योजनांची कामे सुरू होतील, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही.