Police Action : वाशिम येथील आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर, वडील दिलीप खेडकर यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या शेतकऱ्यांना पिस्तुलाने धमकावताना दिसत आहेत. पुण्यातील मुळशी तालुक्यातील धडवली गावातील ही घटना आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप खेडकर यांनी येथे जमीन खरेदी केली आहे. त्याचा हा वाद असल्याचे सांगितले जात आहे. दिलीप हे महाराष्ट्र शासनाचे निवृत्त अधिकारी आहेत.
खेडकर कुटुंबीयांनी बाऊन्सरच्या मदतीने शेजारील शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांना धमकावले, असा आरोप आहे. मनोरमा बळजबरीने त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शेतकरी कुलदीप पासलकर यांनी केला. गेल्या वर्षी 5 जून रोजी हा प्रकार घडल्याचे पुण्याचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्पष्ट केले. मात्र शेतकऱ्याच्यावतीने तक्रार दाखल झाल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मनोरमाकडे पिस्तुलचा परवाना आहे की नाही याचा तपास सुरू असल्याचे पोलिस म्हणाले.
वादाची मालिका
पुण्यातील मुळशी तालुक्यात खेडकर कुटुंबीयांनी 25 एकर जमीन खरेदी केली आहे. त्यावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे मनोरमा आपल्या सुरक्षा रक्षकांसह तेथे गेल्या होत्या. त्यानंतर वाद सुरू झाला. खेडकर यांची मुलगी पूजा सध्या वाशिम येथे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आहे. निवडीतील अनियमिततेव्यतिरिक्त 34 वर्षीय पूजा खेडकर त्यांच्या करोडोंच्या मालमत्तेमुळेही चर्चेत आहेत. पूजा खेडकर या सुमारे 17 ते 22 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मालकीण असल्याचा दावा केला जात आहे. पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या नावावर सुमारे 40 कोटी रुपयांची संपत्ती आहे. दिलीप खेडकर हे महाराष्ट्र शासनाचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 2024 मध्ये अहमदनगर मतदारसंघातून बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला.
पूजा खेडकर यांनी खासगी ऑडीवर अंबर दिवा लावला होता. त्या कारवर 26 हजार रुपयांचा दंड थकित आहे. त्या कारवर 21 वेळा कारवाई झाली आहे. पण दंड भरण्यात आलेला नाही. ऑडी कारची नोंदणी खासगी अभियांत्रिकी कंपनीच्या नावावर आहे. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या चौकशीसाठी केंद्राने गुरुवारी (11 जुलै) एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. पूजा खेडकर यांच्यावर आयएएस पद मिळवण्यासाठी अपंगत्व आणि ओबीसी आरक्षण कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. हा तपास अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केला जात आहे.