Maharashtra Politics : विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदाराचा मोठा घोडेबाजार झाला. महाविकास आघाडीचे केवळ दोन उमेदवार निवडून आलेत. एकाच पराभव झाला. अशात विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदारांवर काँग्रेसने कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी फुटलेल्या सर्वांची नावे दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहेत. लवकरच त्यांच्याविरुद्ध कारवाई होण्याची चिन्हे आहेत. विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यातील उमेदवारामध्ये थेट लढत होती.
काँग्रेसमधून फुटलेल्या आमदारांनी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मतदान केले. पटोले यांनी या फुटीर आमदारांसाठी ‘बदमाश’ हा शब्द वापरला आहे. या बदमाश आमदारांची नावे दिल्लीत पाठवली आहेत. गेल्यावेळी ते सुटले होते. आता त्यांची गय होणार नाही, असे आमदार पटोले म्हणाले. आमदारांचा मोठा घोडेबाजार झाला. त्यामुळे महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झालेत. याऊलट महाविकास आघाडीचे केवळ दोन उमेदवार निवडून आले, असे पटोले म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याप्रकरणी बोलताना गेल्यावेळी सुटलेल्या बदमाशांना यावेळी सापळा रचून पकडण्यात आल्याचे स्पष्ट केले.
कारवाई नक्की
भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करून काही आमदारांनी काँग्रेसशी गद्दारी केली आहे. गद्दारी करणाऱ्या आमदारांची नावे पटोले यांनी दिल्लीला पाठवली आहेत. गेल्या निवडणुकीतही काही जणांनी बदमाशी केली होती. यंदा ते पकडले गेले आहेत. त्यांना पकडण्यासाठी आम्ही यंदा सापळा रचला होता. त्यात ते सापडलेत, असे नाना पटोले यांनी सांगितले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे एकूण 69 मते होती. यात काँग्रेसच्या 37, ठाकरेंच्या 15 व शरद पवारांच्या 12 मतांसह शेकापच्या 1, सपच्या 2 तथा माकप व अपक्षाच्या प्रत्येकी एका मताचा समावेश होता.
मिळालेल्या मतांची संख्या पाहता काँग्रेसचे उर्वरित मते फुटली. काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 28 मते देण्यास सांगितले होते. पण त्यांना केवळ 25 मतं मिळाली. शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवार गटाची 12 मते पडली. मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटाची 15 व काँग्रेसची शिल्लक मते मिळाली. त्यांना काँग्रेसची पहिल्या पसंतीची 7 मते मिळाली. उर्वरित मते महायुतीला वळती झाली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीकाही केली. काँग्रेसचे सात आमदार हे दोन वर्षांपासून काँग्रेस सोबत नव्हतेच, असे राऊत यावेळी म्हणाले.