Parinay Phuke : नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके विजयी झाले आहेत. त्यांच्या रूपाने पुन्हा एकदा ओबीसी समाजाला विधान भवनात बुलंद आवाज मिळालेला आहे. त्यामुळे भंडारा-गोंदियाच्या जनतेच्या हक्काचा माणूस विधान भवनात गेला आहे. भंडारा-गोंदियाकरांसाठी आता ‘अच्छे दिन’ आले आहेत.
विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी शुक्रवारी (ता. 11) मतदान झाले. त्याचा निकालही हाती आला आहे. या निकालात भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके, पंकजा मुंडे, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे, सदाभाऊ खोत विजयी झाले आहे. यात विदर्भाचा चेहरा म्हणून भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्याकडे पाहिले जात आहे.
डॉ. फुके यांच्या विजयाने विदर्भाला दमदार नेतृत्व लाभले आहे. विशेष म्हणजे परिणय फुके हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आणि अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांच्या विजयासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष फिल्डिंग लावली होती. त्याचप्रमाणे विधानभवनातील इतर सदस्यांसोबत फुकेंचे असलेले सलोख्याचे संबंध लक्षात घेता त्यांचा विजय जवळ जवळ निश्चित मानला जात होता.
मृतप्राय भाजपला पुन्हा नवसंजीवनी..
लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर मृतपाय झालेल्या भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील भाजपला या सर्व घडामोडींनी पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे प्रखर विरोधी म्हणून डॉ. परिणय फुके सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या या विजयाने त्यांचा हा विरोध अधिक प्रखरतेने पाहायला मिळणार आहे.
Sudhir Mungantiwar : आम्ही सत्तेत यायचे की नाही, हे ठरवणारे तुम्ही कोण?
लोकसभेच्या पराभवानंतर भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील भाजपची जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.फुके यांना दिली आहे. भाजपच्या हातातून सुटलेला भंडारा – गोंदियाचा गड पुन्हा भाजपच्या ताब्यात आणण्याची जबाबदारी फुके यांना पार पाडायची आहे. त्यांच्या या विजयाने भंडारा गोंदियातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या त्यांच्या नागपुरातील घरासमोर जल्लोषाची तयारी झाली आहे
ओबीसींना मिळाला हक्काचा आवाज..
मराठा – ओबीसी वादात ओबीसी नेते म्हणून डॉ. फुके यांनी ओबीसीचे नेतृत्व करत सरकारला वेठीस धरल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले आहे. नागपूरच्या ओबीसी समाजाच्या आंदोलनात स्वतः सहभाग घेत सरकारवर दबाव आणत ओबीसी समाजातून मराठ्यांना आरक्षण मिळू दिले नाही. मराठा नेते मनोज जरांगे यांना आडव्या हाताने ओबीसी समाजासाठी सरकारविरोधी भूमिका ही त्यांनी घेतलेली आपण पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाने ओबीसी समाजाला विधानभवनात हक्काचा आवाज मिळाल्याचे बोलले जात आहे.
मंत्रिपद मिळणार..
या सर्व घडामोडीत विधान परिषदेचे आमदार डॉ परिणय फुके यांना लवकरच मंत्रिपद मिळणार, अशी शक्यता राजकीय जाणकार वर्तवित आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत जवळीक असल्याने येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या सर्व घडामोडींत भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.