Congress News : सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. पण या विजयामुळे गाफील राहू नका, असे सांगत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पदाधिकाऱ्यांचा क्लास घेतला. विधानसभा निवडणुकीसाठी अधिक जोमाने कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. टिळक भवन येथे चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
बैठकीत पुढची लढाई सोपी नसल्याचेही त्यांनी सांगितले. ‘काँग्रेसच्या कामगिरीवर सतत टीका होत होती. परंतु, लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलले. आज महाराष्ट्रात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगले यश मिळालेले आहे. पण पुढची लढाई सोपी नाही. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील. लोकसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आजपासूनच कामाला लागा, असे आवाहनही रमेश चेन्नीथला यांनी केले. या बैठकीत राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदींची उपस्थिती होती.
काँग्रेसची परंपरा!
काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी युवक काँग्रेसचीही भूमिका महत्त्वाची आहे. काँग्रेसची परंपरा पुढे नेत वाटचाल करा. निवडणुकीत युवक काँग्रेसवर मोठी जबाबदारी असते, घरोघरी जाऊन प्रचार करणे, मतदाराला मतदान केंद्रावर आणणे यासह पक्षाची सर्व कामे युवक काँग्रेसला करायची आहेत, असेही ते म्हणाले.
फक्त 90 दिवस!
विधानसभा निवडणुकीसाठी ९० दिवस बाकी आहेत. या कालावधीत सरकार बदलण्यासाठी सर्व पातळीवर काम करण्याची गरज आहे. राज्यातील सहा विभागात बैठका घेऊन कार्यक्रमांची आखणी करा व प्रत्येक बुथपर्यंत पक्षाचा विचार पोहचवा, असे आवाहन चेन्नीथला यांनी केले.
मोदी नव्हे, राहुल गांधी फेमस!
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी दोन पदयात्रा काढल्या. त्याचा लोकसभा निवडणुकीत चांगला परिणाम दिसून आला.
Sudhir Mungantiwar : आम्ही सत्तेत यायचे की नाही, हे ठरवणारे तुम्ही कोण?
राहुल गांधी जनतेचे दुःख जाणून घेतात आणि जनतेचाही त्यांच्यावर विश्वास वाढलेला आहे. आज देशभरात नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटत चालली आहे तर राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे.
विजयी होण्याची क्षमता हवी!
विधानसभा निवडणुकीत तरुणांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. पण विजयी होण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी देण्याचा विचार पक्ष करेल. काँग्रेस पक्षात नवीन चेहऱ्यांना नेहमीच संधी दिली जाते. महाराष्ट्र, झारखंड व हरियाणा या राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मोठा विजय मिळावा यासाठी काम करा.