Vidhan Sabha : महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जाणारा समृद्धी महामार्ग विरोधकांच्या रडारवर आला आहे. त्याला कारणही तसेच आहे. या महामार्गावर वर्षभराच्या आतच भेगा पडल्या असून यातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल झाली असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
समृद्धी महामार्गाला भेगा पडणे अत्यंत गंभीर बाब असून अपघातांचे प्रमाण वाढण्यास हे एक मोठे कारण ठरू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. ‘राज्यातील महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरु आहे. ५५ हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाच्या बांधकामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचारामुळेच या महामार्गाला वर्षभरातच भेगा पडल्या आहेत,’ असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. एकीकडे मृत्यूचा महामार्ग अशी प्रतिमा निर्माण झालेल्या समृद्धी महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. विधिमंडळ परिसरात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
हीच का मोदींची गॅरंटी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन झाले होते. समृद्धी महामार्गाप्रमाणेच मुंबई-नवी मुंबईला जोडणाऱ्या १८ हजार कोटी रुपयांच्या अटल सेतूलाही भेगा पडल्याचे आम्ही उघड केले होते. हीच आहे का मोदींची गॅरंटी?’ असा सवाल नाना पटोले यांनी केला.
फडणविसांचीच जबाबदारी!
वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीस यांनीच २०१४ साली धनगर व मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. पण सरकारने मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जाणीवपूर्वक चर्चेत आणला. केंद्रात व राज्यात भाजपाचे बहुमताचे सरकार असतानाही केवळ विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी गोंधळ घालण्यात आला.
विधानसभा अध्यक्षांचा एकतर्फी कारभार
९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांवर विरोधी पक्ष सरकारचे पितळ उघडे पाडणार होते पण गोंधळात पुरवणी मागण्या मान्य करून सरकारने लोकशाहीचा खून केला. विधानसभेचे अध्यक्ष एकतर्फी कामकाज करत होते, विरोधकांना बोलू दिले जात नव्हते, अशी टीकाही पटोले यांनी केली.
अंबानींना 1700 कोटी, बहिणींना 1500 रुपये
महायुती सरकार उद्योगपती अनिल अंबानी यांचे १७०० कोटी रुपयांचे कर्ज माफ करते आणि लाडकी बहिण योजनेतून राज्यातील भगिनींना मात्र फक्त १५०० रुपये देते. महागाई वाढलेली असताना केवळ १५०० रुपये देणे, ही माता भगिनींची बोळवण आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.