Big Blow To Maoist Movement : गडचिरोलीतील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. दोन जहाल महिला माओवाद्यांनी गुरुवारी (ता. 11) पोलिस आणि केंद्रीय राखीव दलासमोर (CRPF) आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे आत्मसमर्पण करणाऱ्या एकूण माओवाद्यांची संख्या आता 670 झाली आहे. गुरुवारी आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांमध्ये प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई आणि अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती यांचा समावेश आहे. 36 वर्षीय प्रमिला प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य होती. सप्लाय टीम, स्टाफ टीममध्ये ती कार्यरत होती.
धानोरा तालुक्यातील बोगाटोला (गजामेंढी) येथील प्रमिला रहिवासी होती. अखिला ही देखील प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य होती. 34 वर्षीय अखिला धानोरा तालुक्यातील मरकेगाव येथील मूळ रहिवासी आहे. प्रमिला ही 2005 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली होती. 2011 ते 20114 मध्ये ती वैरागड दलममध्ये कार्यरत होती. त्यानंतर 2014-15 मध्ये केकेडी (कुरखेडा, कोरची, देवरी) दलममध्ये तिला पाठविण्यात आले होते. 2015 मध्ये कंपनी नंबर चारमध्ये प्रमिलाची बदली करण्यात आली. 2018 मध्ये कंपनी नंबर चारमध्येच तिला पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) म्हणून बढती देण्यात आली. 2022 मध्ये डिके सप्लाय टीम, स्टाफ टीममध्ये तिला पाठविण्यात आले. प्रमिलाविरुद्ध आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत. त्यात 20 चकमकींचा (Encounter) समावेश आहे. जाळपोळीच्या दोन कारवायांमध्येही तिचा सहभाग होता. गडचिरोलीतील अन्य 18 गुन्ह्यांमध्ये तिचा समावेश होता.
अखिलाने केल्या चार हत्या
अखिला 2010 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली होती. 2013-14 मध्ये तील प्लाटुन 15 मध्ये सदस्य होती. त्यानंतर तिला कंपनी क्रमांक चारमध्ये पाठविण्यात आले. 2015 पासून ती डीके सप्लाय टीम, स्टाफ टीममध्ये सदस्य होती. त्यानंतर 2018 मध्ये डीके सप्लाय टीम, स्टाफ टीममध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) पदावर तिला बढती देण्यात आली. अखिलाविरुद्ध एकूण सात गुन्हे दाखल आहेत. त्यातील दोन गुन्हे चकमकीचे आहेत. चार खुनाचे गुन्हे आहे. एका अन्य गुन्ह्यातही तिचा सहभाग होता. दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी लोकांकडून गोळा केलेले पैसे स्वत:साठी वापरत असल्याचा दोघींचा आरोप होता. याशिवाय माओवादी महिला सदस्यांना असभ्य वागणूकही देतात.
बाहेर पडण्याचे खरे कारण
आत्मसमर्पण केल्यानंतर प्रमिला व अखिला यांनी सांगितले की, ज्या हेतूने आपल्याला चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते, तो हेतू माओवादी वास्तविकतेत अमलात आणलाच जात नाहीत. चळवळीत आणण्यासाठी युवक-युवतींची दिशाभूल करण्यास सांगण्यात येते. यासाठी गरीब आदिवासींना (Trible) भडकविण्यात येते.दलममध्ये विवाह झाला, तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. याशिवाय सुरक्षा दलांच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे आता जंगलातील वावर सर्वांत धोकादायक झाला आहे. खबरी असल्याच्या फक्त संशयावरून अनेक माओवाद्यांना व निष्पाप लोकांनाही ठार करावे लागते.
सुरक्षा दलांशी चकमक झाली तर टोळीतील पुरुष माओवादी पळून जातात. महिला माओवाद्यांना वाचविण्यासाठी काहीच केले जात नाही. उलट चकमकींमध्ये ठार होणाऱ्या महिला माओवाद्यांची संख्या तुलनेने जास्त असते. माआवोदी चळवळीत दिवसरात्र भटकंती करावी लागते.
Pooja Khedkar. : ‘सरकारने मला बोलण्याची परवानगी दिलेली नाही’
वरिष्ठ माओवादी नेते महिलांना छळत असतात. पोलिसांचा धोका कायम असतो. सततच्या भटकंतीमुळे आरोग्याविषयी समस्या निर्माण झाल्यास, त्या सोडविता येत नाहीत. त्यामुळे अनेक महिला माओवाद्यांना मरण्यासाठी मागे सोडून दिले जाते. बराच विचार केल्यानंतर त्यामुळे आत्मसमर्पणाचा निर्णय घेतल्याचे दोघींनी सांगितले.