Farmer Issue : प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिल्यानंतर आता भाजपच्या माजी खासदारानेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. पावसाळी अधिवेशात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा नाही तर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनाम देऊ, असा इशारा माजी खासदार शिशुपाल पटले यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढलेली महागाई, बेरोजगारी, विजेचे वाढलेले दर यासारख्या प्रश्नांवर राज्यातील महायुती सरकारने अधिवेशनात निर्णय घ्यायला हवा. या समस्या न सोडविल्यास भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचा खणखणीत इशारा माजी खासदार शिशुपाल पटले यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत माहिती दिली. ‘महागाई, बेरोजगारी, विजेचे वाढलेले दर यामुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या धानाला मिळणारा कमी दर, वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान यामुळे तो हवालदिल झाला आहे. परंतु, याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाला जबर फटका बसला. शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नावर राज्य सरकारने मुंबईच्या अधिवेशनात निर्णय घ्यावा, अन्यथा भाजपच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे,’ असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
नुकसान भरपाई द्यावी
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना घोषणा केल्याप्रमाणे 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी द्यावा, रब्बी हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्यात यावी, बावनथडी सिंचन प्रकल्पांतर्गत 13 गावांच्या सिंचनाची व्यवस्था करण्यात यावी, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेपर्यंत 5 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, प्रधानमंत्री आवास योजनेचा घरकुल निधी पाच लाख रुपये करण्यात यावा.
Pooja Khedkar. : ‘सरकारने मला बोलण्याची परवानगी दिलेली नाही’
धान खरेदी केंद्रांच्या समस्यांबाबत झालेल्या मुंबई बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करावी, वीज बिलाचे वाढलेले दर कमी करण्यात यावे, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे अर्ज मंजूर करावे अशी मागणी आहे.