Assembly Elections : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वांना पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाचे वेध लागले आहेत. अनेक वारकरी हे आपल्या दिंडीत सहभागी होत पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. हळूहळू राजकीय पुढारी देखील वारीमध्ये सामील होतील. पण यादरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुध्दा वारीमध्ये सहभागी होणार असल्याची बातमी विशेष लक्ष वेधून घेत आहे.
काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार असून त्यांच्या या दौऱ्याकडे आता सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देश पालथा घातल्यानंतर राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीत त्याचे चांगले परिणाम मिळाले. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात केवळ एका जागेवर समाधान मानणाऱ्या काँग्रेसने यंदा सर्वाधिक जागा जिंकल्या. सर्व पक्षांना मागे टाकत राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. आता अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली असताना राहुल गांधी यांचे वारीत सहभागी होणे गेम चेंजिंग (game changing) ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राहुल गांधी यांनी वारीत सहभागी व्हावे यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना निमंत्रण दिलं होतं. गांधी यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आहे. ते आता पहिल्यांदाच वारीत सहभागी होणार आहेत. राहुल गांधी 13 किंवा 14 जुलै रोजी वारीत सहभागी होतील असे काही दिवसांपूवी सांगण्यात आले होते. आता मात्र त्यांच्या या दौऱ्यासाठी 14 तारीख निश्चित करण्यात आली आहे.
तर विधानसभा निवडणुकीत होणार फायदा
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून ही यात्रा गेली. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत बघायला मिळालेच. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा जिंकता आल्या. काँग्रेसला सुगीचे दिवस आल्याचे राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. त्यामुळे आता पुन्हा विधानसभा निवडणुकीवर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. अश्यात राहुल यांचा पंढरपूर दौरा आयोजित करण्यात आला आहे. याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. लाखो भाविकांची पांडुरंगावर श्रद्धा आहे.
Voting Percentage : गडकरींचं मताधिक्य का घटलं ? भाजपकडून नागपुरात मोठी कारवाई !
या दौऱ्याला विशेष महत्त्व
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल यांच्या या दौऱ्याला चांगलेच महत्त्व आले आहे. राहुल गांधी यांच्या या दौऱ्याचे महाराष्ट्र काँग्रेसतर्फे कसे नियोजन केले जाते? याची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. राहुल गांधी वारीत वारकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.