शेतकऱ्यांसाठी महत्वाचा खरीप हंगाम सुरू आहे. अशात शेतकरी बांधवांना आवश्यक सामग्रीकरीता मदत व्हावी. त्यांना आधार मिळावा, यासाठी चंद्रपूरचे पालकमंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या पीक विमा रक्कमेकरीता आग्रही दिसून येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 111 कोटी 31 लाख रुपयांचा थकीत निधी तातडीने मिळावा, यासाठी मुनगंटीवार सरसावले आहेत. थेट कृषीमंत्र्यांनाच त्यांनी मागणी केली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत 3 लाख 50 हजार 976 शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केला होता. या हंगामात सोयाबीन, कापूस व धान या पिकांचे अवकाळी पाऊस व रोगांमुळे नुकसान झाल्याने, जिल्ह्यातील पिक विमा काढलेल्या 1 लाख 43 हजार 991 शेतकरी लाभार्थी ठरविण्यात आले. त्यांना 191 कोटी 49 लाख 87 हजार रुपये योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत यांपैकी 88 हजार 216 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे आले आहेत. 80 कोटी 18 लाख 78 हजार एवढी ही रक्कम आहे. उर्वरित 55 हजार 775 शेतकरी 111 कोटी 31 लाख 9 हजार रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.
नव्या हंगामातील पेरणी असो वा दैनंदिन शेतीची कामे असो, प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता आहे. त्यामुळे उर्वरित 55 हजार 775 शेतकऱ्यांना पीक विमा तातडीने मिळावा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ओरिएंटल इन्शूरन्स कंपनीने शेतकऱ्यांचा विमा उतरविला आहे. विशेष म्हणजे खरीप हंगाम-2023 मध्ये नागपूर विभागातील सर्वाधिक लाभार्थी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असून, एकही शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी मुनगंटीवार आग्रही आहेत.
नव्या हंगामातील पीक विमा करा
‘प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024’साठी तातडीने शेतकऱ्यांचा विमा करा, असे निर्देश सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पीक विमा काढण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत असून सीएससी सेंटरवरून प्राधान्याने विमा करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय 2023च्या हंगामात ज्यांचा विमा नाकारण्यात आला, त्यांचेही पुनर्निरीक्षण करून अहवाल सादर करम्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.