Maharashtra Monsoon Session Legislative Assembly : दशकापूर्वी राज्य शासनाकडून तालुकास्थळांच्या गावांना नगर पंचायतीचा दर्जा दिला होता. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील आमगावही नगर पंचायत घोषित झाली होती. आमगावची परिस्थिती बघता पालिकेचा दर्जा देण्यात आला. मात्र त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्याने आजही पालिकेचा दर्जा प्राप्त असलेल्या आमगावात निवडणुका होवू शकल्या नाहीत.
दशकभरापासून विकासाचा वनवास आमगावकर भोगत आहेत. या मुख्य मागणीसाठी मंगळवारी (ता. 9 जुलै) मंत्रालयात पावसाळी अधिवेशनदरम्यान आमदार सहषराम कोरोटे यांनी अंगावर ‘नगर परिषदेची निवडणूक घ्या’ असे घोषवाक्य असलेले फलक परिधान करून शासनाचे लक्ष वेधले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमगाव नगर परिषद संघर्ष समितीकडून नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावांतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे मतदानावर बहिष्कार टाकला होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 14 एप्रिलला आमगावमध्ये आले होते. बाबासाहेबांना अभिवादन करून नगर परिषद संघर्ष समितीच्या प्रतिनिधी मंडळाला त्यांनी आश्वासन दिले होते. यावेळी झालेल्या सभेत नगर परिषदेचे न्यायालयीन प्रकरण निकाली काढणार, असे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सलग महिना लोटूनही जिल्ह्यातील पुढारी या विषयावर गप्प बसले आहेत.
14 एप्रिलला बाबासाहेबांना अभिवादन करून दिलेला शब्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाळावा, अशी अपेक्षा नगर परिषद संघर्ष समितीने व्यक्त केली होती. आमगाव नगर परिषद स्थापनेचा विषय राज्य सरकारने मागील 10 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ठेवला आहे. आमगाव नगर परिषद संघर्ष समितीच्या माध्यमातून नगर परिषद स्थापनेचे न्यायप्रविष्ठ प्रकरण राज्य सरकारने निकाली काढावे, यासाठी अनेक प्रयत्न केले. आंदोलने, मोर्चे काढूनही राज्य सरकारने न्याय प्रविष्ट प्रकरण निकाली काढले नाही.
राज्य सरकारने नगर परिषद स्थापनेचा विषय प्रलंबित ठेऊन आठ गावांतील नागरीकांना मिळणाऱ्या योजना सुविधांपासून वंचित ठेवले. याची झळ आठ गावांतील नागरिकांना सोसावी लागत आहे. त्यातच मंगळवारी (9 जुलै) आमदार सहषराम कोरोटे यांनी अधिवेशनाचे औचित्य साधून शासनाचे लक्ष वेधले. आमगाव नगर परिषदेचा मुद्दा त्वरित निकाली काढण्यात यावा व निवडणूका घ्याव्या, यासाठी सभागृहाच्या पायरीवर अंगावर ‘नगर परिषदेची निवडणूक घ्या’ असे घोषवाक्य असलेले फलक परिधान केले. आतातरी सरकारने आमगाव नगर परिषदेचा विषय निकाली काढावा, असे आमदार कोरोटे यांनी म्हटले आहे.